Friday, 2 December 2016

पोलिसांसाठी दोन वर्षात 30 हजार सर्वसुविधायुक्त निवासस्थानाचे बांधकाम पूर्ण --- देवेंद्र फडणवीस





  • पोलिसांच्या निवासस्थानासाठी दोन हजार कोटी
  • निवृत्तीनंतर मालकी हक्काचे घर देण्याची योजना
  • ऑपरेशन मुस्कानंतर 10 हजार मुलांचा शोध
  • नागपूर येत्या तीन महिन्यात सीसीटीव्ही सर्व्हिलन्समध्ये
  • पोलिस आयुक्त कार्यालयाची सुसज्ज इमारत

नागपूर, दि. 31 :  पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्वसुविधा असलेले निवासस्थाने असावी यासाठी मागील दोन वर्षात सर्वाधिक 30 हजार निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. नागपूर-नाशिकसह वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या पोलिसांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी पोलिस गृहनिर्माणासाठी दोन हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बजाजनगर येथील नवीन पोलिस स्टेशनचे उद्घाटन तसेच पोलिस कर्मचाऱ्यांसाठी गिट्टीखदान परिसरात 280 घरकुल बांधण्याचा शुभारंभ मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, कृष्णा खोपडे, गिरीष व्यास, डॉ.मिलिंद माने, विकास कुंभारे, विभागीय आयुक्त अनूप कुमार तसेच पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, सहपोलिस आयुक्त संतोष रस्तोगी, नासुप्रचे विश्वस्त भूषण सिंगणे, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, माजी महापौर मायाताई इवनाते आदी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांसाठी अस्तित्वात असलेले निवासस्थाने हे इंग्रजांच्या काळात बांधलेले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र काम करतात. अशा परिस्थितीत सर्वसुविधा असलेले निवासस्थाने बांधण्याचा निर्णय घेतला असून बांधकामासह दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. घाटकोपर येथे 8 हजार घरांची स्मार्ट टाऊनशिप तयार करण्यात आली असून त्याच धरतीवर राज्यात गृहबांधणीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांना सांगितले.
पोलिस कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरही हक्काचा निवारा असावा यासाठी अल्प किंमतीत मालकी हक्काचे घरे देण्याची योजना राज्यात सुरु करण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निवृत्त पोलिसांना मालकी हक्काचे घरे देण्यात येणार आहे. मुंबईत 10 हजार मालकी हक्काचे घरे देण्याची योजना असून त्याच धरतीवर नागपुरातही ही योजना राबवून पोलिसांच्या जिवनात परिवर्तन आणण्यात येईल.
नागपुरात येत्या तीन महिन्यात सीसीटीव्ही सर्व्हिलन्स योजना
नागपूर शहराच्या विकासासोबतच कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुक सुधारणेसाठी शहरात येत्या तीन महिन्यात कमांड अँड कंट्रोल सिस्टीम अंतर्गत सीसीटीव्ही सर्व्हिलन्स यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा करतांना मुख्यमंत्री देवेंद फडणवीस म्हणाले की, एल अँड टी ही कंपनी आधुनिक यंत्रणे बसविण्याचे काम करणार आहे. या यंत्रणेमुळे संपूर्ण नागपूर हे वायफाय होणार असून  पोलिसांना नियंत्रणासाठी ही यंत्रणा उपयुक्त राहणार आहे. नागपूरचे मॉडेल इतर ठिकाणीही आदर्श ठरेल असेही त्यांनी सांगितले.
पोलिस आयुक्ताला तसेच जिल्हा पोलिस अधिक्षकाचे कार्यालय अत्यंत आधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार असून या कार्यालयात आवश्यक सर्व सुविधा राहतील. तसेच कंमाड अँड कंट्रोल सिस्टीमचे नियंत्रण येथूनच होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत गहाळ झालेल्या दहा हजार मुलांचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबा पर्यंत पोहचविण्याचे महत्वपूर्ण कार्य पोलिस विभागाने केले असून या कुंटुंबामध्ये मुलगा मिळाल्याची दिवाळी साजरी होत आहे. महाराष्ट्र पोलिसांचा गौरव वाधविणारी ही घटना आहे. महाराष्ट्र हे देशात ई-तक्रार दाखल करणारे प्रथम राज्य असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, पुणे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरु केली असून नागरिकांचाही चांगला सहभाग मिळत असल्याने इतर शहरातही योजना राबविण्यात येणार आहे.
गुन्हांचा शोध लावण्यासोबतच गुन्हेगारांना शिक्षा करण्यापर्यंत पोलिस विभागाने केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे देशात महाराष्ट्राचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे. गुन्हांचा शोध लावण्यामध्ये 9 टक्क्यावरुन 52 टक्क्यापर्यंत वाढ झाली असून गंभीर गुन्ह्यांचा शोधात 32 टक्क्यापर्यंत वाढ झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पोलिस कर्मचाऱ्यांना घर उपलब्ध करुन देतानांच त्यांच्या कुटुंबांसाठी विशेषत: महिलांसाठी कौशल्य विकास योजना प्रत्येक ठिकाणी सुरु करा अशी सूचना करतांना पोलिस विभागातील पोलिस व पोलिस निरिक्षक यांच्या कार्यशैलीवरच संपूर्ण विभागाचा नावलौकिक अवलंबून असून उत्कृष्ट कार्याद्वारे महाराष्ट्र पोलिसांचा नावलौकिक वाढवा असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना प्रत्यक्ष राबविण्यासाठी शहरातील रस्ते व पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे अपघात प्रवण स्थळांचा दुरुस्तीसाठी 11 हजार कोटी रुपयाचा निधी असून नागपूर शहर व जिल्ह्याचा प्रस्ताव तयार करा. वाहतूक नियंत्रणासाठी नवीन धोरण लवकरच जाहीर होत असल्याचे सांगतांना ते म्हणाले की, डिजिटल लॉकर या योजनेचा 18 कोटी नागरिकांना लाभ होणार आहे. नागपूरच्या उष्णतेमध्ये वापरता येईल असे लाईट हेल्मेट तयार करण्यासाठी योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांसाठी चांगले निवासस्थान ई-लायब्ररी, व्यायाम शाळा आदी सुविधा निर्माण केल्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीतही वाढ होणार असून गुन्हेंगारीवर वचक बसवितांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई करा. परंतु निरपराधाला त्रास होणार नाही याची खबरदार घेण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहर व ग्रामीण पोलीस गुन्हेंगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्तपणे काम करत असल्याचे सांगतांना नागपूर शहरातील बजाजनगर, शांतीनगर, कळमना, मौदा, हिंगणा, कान्होलीबारा, हुडकेश्वर आदी पोलिस स्टेशनच्या बांधकामासाठी आवश्यक असणारा संपूर्ण निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पोलिस प्रशिक्षण केंद्रासाठी 13 कोटी रुपये खर्चून प्रशिक्षण केंद्राचे सूसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. नागपूर पोलिस आयुक्तालय व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे सूसज्ज बांधकामासाठी निधी देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मिहानसह औद्योगिक व इतर संस्थांसाठी सुमारे 20 हजार सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असल्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणासाठी नागपूर येथे महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे कार्यालय सुरु करण्याची सूचना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस विभागाच्या सुधारणेसाठी व आधुनिकीकरणासाठी 74 सुधारणा सुचविल्या होत्या. त्यापैकी 34 सुधारणा पूर्ण झाल्या असून या विभागाला आधुनिकीकरणाची जोड मिळत असल्यामुळे एक सक्षम विभाग म्हणून नावलौकिक मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पोलिस आयुक्त के.वेंकटेशनम यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्याचा प्रकल्पाबाबत तसेच नवीन पोलिस स्टेशनच्या निर्मितीसह येथील सुविधाबद्दल माहिती दिली. आभार प्रदर्शन सहपोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी केले.
बजाजनगर पोलिस स्टेशनचे उद्घाटन
नवनिर्मित बजाजनगर पोलिस स्टेशनचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. बजाजनगर येथील पोलिस स्टेशनमुळे नागरिकांना सुरक्षा तसेच समाजात सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष मदत मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त अनूप कुमार तसेच पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, सहपोलिस आयुक्त संतोष रस्तोगी, पोलिस उपआयुक्त श्रीमती दिपाली मासिरकर, सहपोलिस आयुक्त श्रीमती अश्विनी पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजरतन बनसोड, बजाज नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर नंदनवार तसेच पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
**********

No comments:

Post a Comment