Sunday, 28 October 2018

कला दालनातून आरोग्यविषयक जनजागृती करण्यास सहकार्य - नागेश भोसले



* अटल आरोग्य महाशिबिराला सिनेअभिनेत्याची शूटिंग सोडून उपस्थिती




नागपूर, दि 28 : कला क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती दर्शकांच्या मनोरंजनासाठी काम करत असतात. परंतु कला आणि आरोग्य शिबिराचा मेळ घालण्याचा प्रयत्न हा फार क्वचितच होतो. हा मेळ घालून आपल्या अभियनाच्या कलेतून लोकांना आरोग्यविषयी जनजागृती करण्यासाठी संधी मिळाली असल्याचे मत मराठी सिनेअभिनेता नागेश भोसले यांनी व्यक्त केले.
काची चौक येथील सेंट्रल बाजार रोड वरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात अटल आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अभिनेता नागेश भोसले यांनी शिबिरास भेट देऊन येथील 'ओपीडी'मध्ये काम करीत असलेल्या डॉक्टरांशी चर्चा केली.
सिनेअभिनेता नागेश भोसले म्हणाले की, नुकतेच लातूर येथे अटल आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिबिरास भेट देण्याकरिता आयोजकांच्या वतीने निमंत्रण देण्यात आले. परंतु, नांदेड येथे एका चित्रपटाची शूटींग सुरु असल्याने आरोग्य शिबिरात जाता आले नव्हते. ही खंत मनात असतांनाच दुसरे शिबीर नागपूर येथे होत असल्याची माहिती मिळताच बंगळुरु येथील चित्रपटाची दोन दिवसांची शुटींग रद्द करुन थेट नागपूर गाठले असल्याचे त्यांनी सांगितले.
कलाकार हा पडद्यावर आपल्या कला-कौशल्याने लोकांचे मनोरंजन करीत असतो. हे कार्य करताना तो निस्वार्थ भावनेने यामध्ये स्वत:ला झोकून देतो. ही निस्वार्थ सेवा भावना आरोग्य महाशिबिरात दिसून आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांची समाजाला खरी गरज आहे. आरोग्याविषयी जागरुकता आणून त्यांना आरोग्याची जपवणूक करण्याची शिकवण दिलेली पाहून भरभरुन आनंद वाटला. विशेष म्हणजे रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे प्रत्यक्षदर्शी बनण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले.
ग्रामीण भागात आजही आरोग्याविषयी जागृती नसल्याने डोळे तपासणी, मधुमेह, उच्चरक्तदाब अशा छोट्या आजारांकडेही दुर्लक्ष केले जाते. कालांतराने हे छोटे आजार मोठे रुप घेतात आणि कुणालातरी जीव गमवावा लागतो, हे टाळण्यासाठी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून हळूहळू लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व सहकार्याचे अभिनंदन केले पाहिजे. कलाकार म्हणून अशा शिबिरामध्ये जनजागृतीसाठी का होईना परंतु सेवा देण्याची संधी मिळत असेल, तर आम्ही केव्हाही तयार आहोत. कारण शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील जनतेकरिता अशा शिबिरांची गरज असल्याचे मत सिनेअभिनेता नागेश भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.
*****

No comments:

Post a Comment