Friday, 31 March 2017

स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने आग्रही असावे – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

मुंबई, दि.29 : स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने आग्रही असावे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कालमर्यादा ठेवावी असे निर्देश विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत दिले.
बुलढाणा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानपरिषद सदस्या विद्या चव्हाण, सुनील तटकरे, भाई जगताप आणि अमर राजूरकर यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता.
योवळी विधानपरिषदेचे सभापती श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिकांसाठी राज्य शासनामार्फत तयार करण्यात येणारे नियम, धोरणे काळाच्या ओघात पुन्हा एकदा तपासून घेण्याची गरज आहे. राज्य शासनाचे स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रश्नांबाबत धोरण लवचिक असणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे पुरस्कार, पेन्शन आणि इतर बाबींविषयी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका ठेवणे आवश्यक आहे.
पर्यटन आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितले की, गुलाबराव अढाव यांनी स्वांतत्र्य सैनिक म्हणून पेन्शन मिळण्याबाबतचा अर्ज जिल्हा गौरव समिती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीने तपासला आहे. तरी या विषयाबाबत श्री. अढाव यांनी पुन्हा एकदा अर्ज करुन नवीन पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन याविषयाबाबत फेरतपासणी करण्यात येईल.
००००

No comments:

Post a Comment