* कृषी विभागाचा सल्ला
नागपूर, दि. 07 : माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शेतकऱ्यांनी कृषी संबंधी समस्यांचे निराकरण करावे. त्यासाठी शासनाच्या वतीने ‘किसान कॉल सेंटर योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन पुणे येथील कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
टेलिफोन कॉलवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता यावी, याकरिता ‘किसान कॉल सेंटर योजना’ सुरु करण्यात आली आहे. देशात 14 ठिकाणी कॉल सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. 1800-180-1551 या टोल फ्री क्रमांकावर देशातील कुठल्याही भागातून मोबाईल किंवा लॅन्डलाईन द्वारे सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत संपर्क साधू शकतात. देशातील विविध 22 भाषांमध्ये या क्रमांकावरुन संवाद साधला जातो. महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी पुणे हे मुख्यालय असून येथे मराठी व कोकणी भाषेचा वापर करण्यात येतो. या सेंटरच्या माध्यमातून शेतीशी संबंधित 72 विषयांच्या समस्यांचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन केले जाते.
‘किसान कॉल सेंटर’ वर कार्यरत फार्म टेली ॲडव्हायजर हा विषयातील पारंगत व्यक्ती असतो. स्थानिक भाषेचे ज्ञान असल्याने सेंटरवरील प्रतिनिधी शेतकऱ्यांशी सुलभतेने संवाद साधू शकते. फार्म टेली ॲडव्हायजरीद्वारे ज्या प्रश्नांची उत्तरे देणे अशक्य असते, त्या प्रश्नांना राज्य कृषी विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राज्य कृषी विद्यापीठाचे विशेषज्ञ यांच्याकडे पाठविण्यात येतात. एम-किसान पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास त्यांना एसएमएस द्वारे कृषी सल्ला व विविध वस्तूंच्या बाजार किंमतीची माहिती देण्यात येते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ‘किसान कॉल सेंटर योजने’चा लाभ घेण्याचे आवाहन पुणे येथील कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment