Tuesday, 28 May 2024

अंबाझरी धरणाची अल्पमुदतीची कामे जुनच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करा - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

 

नागपूर, दि. 27: अंबाझरी  धरणाच्या सांडव्याचे पाणी  वाहून जाण्यासाठी दोन्ही पुलांचे बांधकाम, मातीबांध बळकटीकरणाचे कामे, क्रेझी कॅसल येथील उर्वरित दोन पूल तोडण्यासह परिसरातील नदी व नाले सफाई आदी अल्पमुदतीची कामे येत्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिले. 

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

बैठकीस समितीचे  सदस्य सचिव  तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते, सदस्य जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अधिक्षक अभियंता ज.ह.भानुसे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार, मनपाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी , उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्यासह महामेट्रोरेल, नागपूर सुधार प्रन्यास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी विभागांचे अधिकारी  यावेळी उपस्थित होते. 

 

 उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी  करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विविध  शासकीय यंत्रणांच्या समन्वयाद्वारे समितीद्वारे सुरक्षेच्यादृष्टीने अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून  वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम सुरु असून हे काम वेळेत पूर्ण करुन दुसऱ्या पुलाचे बांधकामही हाती घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी दिले.  ही कामे करतांना सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांनी वीज वाहिन्यांची कामे पूर्ण करण्यासह येथे वाहतुकीच्यादृष्टिने उचित उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

क्रेझी कॅसल परिसरात विविध उपाय योजनांतर्गत जवळपास 64 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. येथील एकूण 8 पूलं तोडण्याची कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत 6 पूल तोडण्यात आली आहेत. उर्वरित 2 पूलं जुनच्या पहिल्या पंधरावड्यापूर्वी तोडण्याचे निर्देश देत या भागातील नाग नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे कामही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणांतर्गत मातीबांध बळकटीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. शहरातील रस्त्यांवर धोकादायक स्थितीतील झाडांची छटाई तसेच नदी-नाल्यांच्या सफाईची कामेही नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी यंत्रणांना देण्यात आले. अंबाझरी धरण परिसरातील स्वामी विवेकानंद यांचा पुतळा स्थलांतरीत करण्याच्या विषयावरही चर्चा झाली.   

      अंबाझरी  धरणाच्या बळकटीकरणाच्या कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येत असून या कामांच्या प्रगतीचा अहवाल समितीतर्फे  उच्च  न्यायालयाला नियमितपणे सादर  करण्यात येत आहे.

००००० 

Tuesday, 21 May 2024

विभागीय आयुक्त कार्यालयात ‘ दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा

 



 नागपूर, दि. 21: ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात  साजरा झाला.

आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात विभागीय चौकशी समितीच्या प्रमुख दिपाली मोतियेळे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ’ दिली. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी देशभर ‘ दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून साजरी करण्यात येते.

                                                            0000

Monday, 20 May 2024

इयत्ता 12वीचा निकाल आज, शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

 

        नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024  मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत.

            महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  पुणेनागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024  मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल महामंडळाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. ही संकेतस्थळे खालील प्रमाणे आहेत.

1)     mahresult.nic.in

2)     http://hscresult.mkcl.org

3)     www.mahahsscboard.in

4)   https://results.digilocker.gov.in

5)    www.tv9marathi.com

6)     http://results.targetpublications.org

 

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहीत करुन ठेवण्याची सोय उपलब्ध आहे.

 

            यासोबतच  mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in  या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतिसाठी दिनांक 22 मे2024 ते 5 जुन 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईलअशी माहिती नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय  सचिव चिंतामण वंजारी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

000000

Wednesday, 15 May 2024

अंबाझरी धरण बळकटीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी गतीने पूर्ण करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश

 


 

नागपूर दि. 15 : अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक सर्व कामे पावसाळ्याआधी गतीने पूर्ण  करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले.  

 

अंबाझरी  धरणाच्या  बळकटीकरणासाठी   विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय समितीची सहावी बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस श्रीमती बिदरी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी  करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.  

   बैठकीस समितीचे  सदस्य सचिव  तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, सदस्य जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार , मनपाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी , उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांच्यासह महामेट्रोरेल, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी विभागांचे अधिकारी  यावेळी उपस्थित होते.  

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी हाती घेण्यात आलेली कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत  उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी

विविध  यंत्रणांच्या   समन्वयाद्वारे  समितीने सुरक्षेच्यादृष्टीने  उपाययोजनांना केल्या आहेत. यानुसार पहिल्या टप्प्यातील कामानंतर दुसऱ्या टप्प्या अंतर्गत या धरणाच्या जवळपास 42 हजार क्युबिक मीटर वर मातीबांध बळकटीकरणाचे कामे अंतिम टप्प्यात असून ही कामे पावसाळ्याआधीच पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी श्रीमती बिदरी यांनी जलसंपदा विभागाला दिले.

अंबाझरी  धरणाच्या सांडव्यावरून  वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम सुरु झाले आहे. पुलाचे बांधकाम करतांना वीज वाहिन्यांची कामे  सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांनी समन्वयाने पूर्ण करावीत. ही कामे  पावासाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दिशेने नियोजन करावे. याठिकाणी वाहतूकीच्यादृष्टिने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.     

 

 

धरणाच्या प्रवाहाला अडथडा निर्माण करणारी अतिक्रमन तातडीने काढणे, परिसरातील नाग नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाची कामे, नाले सफाई आदी कामांनाही वेग देऊन  पावसाळ्यापूवी्र पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. अंबाझरी  धरणाच्या बळकटीकरणाच्या कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येत असून या कामांच्या प्रगतीचा अहवाल समितीतर्फे  उच्च  न्यायालयाला नियमितपणे सादर  करण्यात येत आहे.

००००० 

छत्रपती संभाजी महाराजांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 



 

नागपूर, दि.१४ : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

         आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात  सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, आस्थापना उपायुक्त विवेक इलमे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००००

Thursday, 2 May 2024

समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प घेवूया - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


 








नागपूर, दि. 1 : महाराष्ट्राने देशाच्या विकासात सामाजिक सुधारणांचा भक्कम पाया रोवला आहे. राज्याने औद्योगिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे तसेच विविध क्षेत्रात राज्याने प्रगतीचे मानके साध्य केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आपण सिंहावलोकन करून समृद्ध राज्य घडवण्याचा संकल्प करुया, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

 

येथील कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस आयुक्त छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारच्या नागपूर स्थित विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी-कर्मचारी  यावेळी उपस्थित होते.

 

राज्याने स्थापनेपासून विविध क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली आहे. विकासाच्या वाटचालीत नागपूर व विदर्भाने नागरी सुविधांवर भर देवून पायाभूत सुविधेच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल आदी नव्या प्रगतीची नांदी असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

 

श्रमातून नवनवीन सृजन करणाऱ्या कामगारांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत कामगारदिनाच्या शुभेच्छा  दिल्या.

 

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री  श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस बँडपथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताचे सादरीकरण केले. पथसंचलनात सहाभागी होणाऱ्या विविध पथकांचे त्यांनी निरीक्षण केले. परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक कोते यांच्या नेतृत्वात राज्य राखीव पोलीस बल, नागपूर शहर व ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस अशा विविध पथकांचे पथसंचलन झाले.

00000