Wednesday, 14 October 2026

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन नागपूर, दि. १५ :माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर आयुक्त( सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 00000

दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य

दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य अल निनोच्या प्रभावामुळे तसेच हवामानातील बदलामुळे मान्सूनच्या पावसात मोठी घट झाली आहे, राज्यात सरासरी 13 टक्के पेक्षा जास्त पाऊस कमी पडला आहे. कमी पाऊस व पावसातील खंड यामुळे जलसाठ्यानी आताच तळ गाठला आहे . विदर्भात 23 टक्के तर मराठवाड्यात 40 टक्के सरासरीपेक्षा कमी पावस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सिंचन प्रकल्प तसेच उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. दिनांक ३१ ऑगस्ट २०२७पर्यंत पिण्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. नागपूर विभागातील सर्वच जलसाठ्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मोठ्या जलसाठ्यांमध्ये 23 टक्के पेक्षा जास्त घट झाली आहे. यामध्ये नागपूर , नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील जलसाठ्याचा समावेश आहे .मध्यम प्रकल्पामध्ये सुद्धा सरासरी 16 टक्के पेक्षा जास्त जलसाठ्यात मागील वर्षाच्या तुलनेत घट झाल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीच्या आवश्यक उपाययोजना लागू केल्या आहेत, पिण्याच्या पाण्याची उपलब्ध उपलब्धता अबाधित राहावी तसेच जनावरांना साठी आवश्यक पाण्याची व्यवस्था निश्चित करण्यासाठी सिंचन प्रकल्प निहाय पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार जिवंत पाणी साठ्यापैकी किमान दहा टक्के साठा आपत्कालीन साठा म्हणून राखून ठेवण्यात येणार आहे. महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात उपलब्ध पाण्याची काटकसरीने वापर करून पाण्याची होणारी गळती थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे त्यासोबतच भूगर्भातील पाण्याचा साठा सुरक्षित राहावा यासाठी इंधन विहिरीत सारख्या उपयोजना थांबविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण भागातही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही या दृष्टीने सूक्ष्म नियोजन आला सुरुवात झाली आहे. उपलब्ध जलसाठे सुरक्षित करून पाण्याचे आरक्षणा नुसार नियोजनाला सुरुवात झाली आहे. दुष्काळामध्ये पाणी वापराला प्राधान्य.... दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असून उपलब्ध जलसाठ्यातून 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत, यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. विविध जलसाठे व सिंचन प्रकल्पात उपलब्ध साठ्यापैकी पिण्याच्या पाण्याचा अग्रक्रमाने वापर करण्यात येणार आहे त्यानंतर औद्योगिक व कृषी क्षेत्राला पाणी देण्यात येईल. औद्योगिक क्षेत्रात पाणी वापरताना सरासरी 30% पेक्षा जास्त पाण्याचे पुनर्वापर करण्यात यावा तसेच पिण्याच्या पाण्याचा वापर आवर बंधने घालावीत असे निर्देशही देण्यात आले आहेत. सिंचनासाठी पाण्याचा वापर करताना पशुधनासाठी चाऱ्याचा वापर आला प्राधान्य देण्यात यावे तसेच बियाण्याच्या कार्यक्रमासाठी पाण्याचा वापर केल्यानंतरच रब्बी हंगामासाठी उपलब्ध पाणी असल्यास विचार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील धरणे कालवे नद्या , तलाव व इतर जलस्त्रोतांतून होणाऱ्या अनधिकृत व बेकायदेशीर पाणी उपसा तात्काळ थांबविण्यात येणार आहे यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर पाण्याचा वापर करणाऱ्या करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी तसेच निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी सुरू असतानाच जनतेनेही दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याच्या वापरावर निर्बंध घालावी पाण्याचा कुठेही गैरवापर होणार नाही तसेच उपलब्ध होणारे पाणी जपून वापरावे असे आव्हान केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यातील बनवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनास जनतेने सहकार्य करणे आवश्यक आहे. -संचालक माहिती कार्यालय नागपूर

नागपूर विभागात २ लाख ५५ हजार ६०३ पदवीधर मतदार

नागपूर विभागात २ लाख ५५ हजार ६०३ पदवीधर मतदार ४४५ मतदान केंद्रे नागपूर विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक नागपूर, दि. १२ - नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विभागातील सहा जिल्ह्यांत एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष, १ लाख ८ हजार ३०१ महिला आणि २२ इतर मतदारांचा समावेश आहे. एकूण ४४५ मतदान केंद्रे असल्याचे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे. जिल्हानिहाय आकडेवारीत नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ४४ हजार ४६६ मतदार असून, चंद्रपूर जिल्ह्यात ३२ हजार २६२, गोंदिया जिल्ह्यात २२ हजार १७६, वर्धा जिल्ह्यात २१ हजार ७४२, भंडारा जिल्ह्यात २१ हजार ३४९ आणि गडचिरोली जिल्ह्यात १३ हजार ६०८ मतदार आहेत. नागपूर जिल्ह्यात २४६ मतदान केंद्रे असून, येथे ७६ हजार ७५४ पुरुष, ६७ हजार ६९० महिला आणि २२ इतर असे एकूण १ लाख ४४ हजार ४६६ मतदार आहेत. भंडारा जिल्ह्यात ३५ मतदान केंद्रांवर १३ हजार २४७ पुरुष आणि ८ हजार १०२ महिला असे एकूण २१ हजार ३४९ मतदार आहेत. गोंदिया जिल्ह्यात ३९ मतदान केंद्रे असून, १३ हजार ९६५ पुरुष आणि ८ हजार २११ महिला असे एकूण २२ हजार १७६ मतदार आहेत. वर्धा जिल्ह्यात ४१ मतदान केंद्रांवर १३ हजार ९९ पुरुष आणि ८ हजार ६४३ महिला असे एकूण २१ हजार ७४२ मतदार नोंदविण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ५८ मतदान केंद्रे असून, २० हजार ९०५ पुरुष आणि ११ हजार ३५७ महिला असे एकूण ३२ हजार २६२ मतदार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात २६ मतदान केंद्रांवर ९ हजार ३१० पुरुष आणि ४ हजार २९८ महिला असे एकूण १३ हजार ६०८ मतदार आहेत. विभागातील दिव्यांग मतदारांची संख्या १४ हजार १९७ आहे. यामध्ये ८ हजार ९३३ पुरुष, ५ हजार २६२ महिला आणि दोन इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्हानिहाय विचार करता, नागपूर जिल्ह्यात ८ हजार ६४, भंडारा जिल्ह्यात १ हजार ३४, गोंदिया जिल्ह्यात १ हजार ८८७, वर्धा जिल्ह्यात ५८६, चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार ९४७ आणि गडचिरोली जिल्ह्यात ६७९ दिव्यांग मतदार आहेत. विभागात ८० वर्षांवरील मतदारांची संख्या ८५५ आहे. यामध्ये ७३८ पुरुष आणि ११७ महिला मतदारांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात ८० वर्षांवरील ७२१ मतदार आहेत. भंडारा जिल्ह्यात ३६, गोंदिया जिल्ह्यात २४, वर्धा जिल्ह्यात ३६, चंद्रपूर जिल्ह्यात ३४ आणि गडचिरोली जिल्ह्यात चार मतदार या वयोगटातील आहेत. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आणि मतदान केंद्रे आहेत, तर गडचिरोली जिल्ह्यात सर्वांत कमी मतदार व मतदान केंद्रे आहेत. 000000

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष द्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष द्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे निर्देश *निवारा कक्ष, मदत वितरण केंद्रे आणि मोबाईल चार्जिंग स्टेशनची व्यवस्था नागपूर, दि. 12 : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी नागपुरात येत असल्याने त्यांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे. विशेषतः आरोग्यविषयक सुविधांची पुरेशी व्यवस्था ठेवावी. वैद्यकीय कक्ष, आवश्यक औषधसाठा, फिरते रुग्णालय आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यासह आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी , नागपूर महानगरपालिका आयुक्त डॅा. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह विविध विभागांचे संबंधित वरिष्ठ अधिकारी, आयोजन समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुयायांसाठी विशेष निवारा कक्ष उभारण्यात येणार आहेत. दीक्षाभूमी परिसरात जर्मन हँगर तंत्रज्ञानावर आधारित निवारा कक्ष उभारण्यात येणार असून, त्यामध्ये पंखे, कुलर, प्रकाशयोजना तसेच अंथरूण-पांघरूणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे कक्ष पाणीरोधक आणि अग्निरोधक असतील. कक्षांच्या सभोवतालच्या कापडावर अग्निरोधक स्प्रेचा वापर करण्यात येणार आहे. या निवारा कक्षांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी संबंधित नावे देण्यात येणार आहेत. निवारा कक्षांच्या परिसरात संविधान साहित्यावर आधारित ‘भीमसृष्टी’ उभारण्यात येणार आहे. अनुयायांना आवश्यक मदत आणि माहिती वेळेत मिळावी यासाठी तक्रार निवारण केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि बालकांसाठी खेळण्याची जागाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय अनुयायांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी मदत वितरण केंद्रांची व्यवस्था करताना गर्दीचे योग्य नियोजन करावे, तसेच वितरण प्रक्रिया सुरक्षित आणि सुव्यवस्थित राहील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहणार असल्याने मोबाईल चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करताना विद्युत सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. विद्युत जोडण्या, उपकरणे आणि चार्जिंगची ठिकाणे सुरक्षित असावीत. शॉर्टसर्किट किंवा अन्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवून संबंधित यंत्रणांनी नियमित देखरेख करावी, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. स्वच्छतेच्या दृष्टीने परिसरात नियमित साफसफाई, जंतुनाशक आणि डासप्रतिबंधक फवारणी, फिरती स्वच्छतागृहे तसेच पुरेशा कचराकुंड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त, महिला सुरक्षा पथक, अग्निशमन दल आणि नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. अनुयायांना दिशादर्शक नकाशे आणि उद्घोषणा प्रणालीच्या माध्यमातून आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनुयायांना मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक 1800-123-0061 जाहीर करण्यात आला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखावा. अनुयायांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. ***