फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. च्या ग्रीन बिल्डिंगचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते संपन्न
नागपूर, दि.29 : फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. नागपूरच्या ग्रीन बिल्डिंगमुळे पर्यावरणाच्या जाणिवा जनसामान्यांमध्ये रुजण्यात निश्चितच सहाय्यभूत ठरणार आहे. ग्रीन बिल्डिंगच्या माध्यमातून संस्थेने पर्यावरण संतुलन, जैवविविधता, वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.
हिंगणा रोड येथील फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. च्या पर्यावरण पोषक (ग्रीन) प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास वने राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव अत्राम, महापौर प्रवीण दटके, वने सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, प्रधान मुख्य वनसंरक्षक(वनबल प्रमुख) सर्जन भगत, एफडीसीएम लि. चे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल तसेच विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रीन बिल्डिंगच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच एफडीसीएम च्या वतीने संकलित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे विमोचनही करण्यात आले.
फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. च्या ग्रीन बिल्डिंगचे उद्घाटनपर भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर शहराचे शासकीय कार्यालयीन इमारतीत एफडीसीएम भवन ही पहिली बिल्डिंग आहे. अशाप्रकारे पर्यावरण विषयक कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी संस्थेने अधिकाधिक उपक्रम राबवावेत. ग्रीन बिल्डिंगच्या माध्यमातून वन विभागाला नवे आयाम प्राप्त झाले आहे. निसर्गाच्या मूळ स्वरुपाचे संवर्धन करुन ग्रीन बिल्डिंगमुळे विद्युत तसेच जल बचत करता येते. यापुढेही एफडीसीएम च्या वतीने अधिकाधिक पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवून वन खात्याची नवी ओळख निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
एफडीसीएम भवन ही इमारत ग्रीन बिल्डिंग म्हणजे पर्यावरण पोषक इमारत म्हणून इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल कडून प्रमाणित करण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरिता इमारतीत विद्युत बचत, पाणी बचत, जल संवर्धन इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. नागपूर शहरातील शासकीय कार्यालयीन इमारतीत एफडीसीएम भवन ही पहिली ग्रीन बिल्डिंग आहे.
एफडीसीएम भवन ही इमारत सहा मजली असून इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ 4528 चौरस मीटर (48721 चौ. फूट) इतके आहे. इमारत बांधकामाचा अंदाजित खर्च 11.74 कोटी इतका असून बांधकाम नागपूर सुधार प्रन्यास कडून करण्यात आले. इतर कामे वातानुकूल यंत्रणा, फर्निचर, विद्युत जोडणी, रस्ता, पार्किंग शेड इत्यादीचा अंदाजित खर्च 3.71 कोटी इतका आहे
*****
No comments:
Post a Comment