Ø 200 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ
Ø 354 दिव्यांगाना विविध साहित्याचे वाटप
Ø झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप सुलभ
Ø अविकसित लेआऊटच्या विकासासाठी 100 कोटी रुपये
Ø नागपूर जिल्हा 2 ऑक्टोबर पर्यंत डिजीटल जिल्हा
Ø राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल करणार
नागपूर, दि.31 : देशातील मध्यवर्ती व महत्वपूर्ण शहर म्हणून नागपूरचा विकास करतांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाची सांगड घालून येत्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय शहराप्रमाणे नागपूरचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विदर्भ वैधानिक विकास महामंडळ कार्यालयाच्या परिसरात 354 दिव्यांगाना गरजेनुसार आधुनिक साहित्याचे वितरण तसेच दक्षिण- पश्चिम विधानसभा क्षेत्रातील दोनशे कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. तर विशेष पाहुणे म्हणून महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, इमारत बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष मुन्नाजी यादव, आमदार सुधाकरराव कोहळे, मितेश भांगडीया, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदिप जोशी, रमेश शिंगाडे, अविनाश ठाकरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती कादंबरी बलकवडे, प्रा. राजीव हडप, श्रीमती सुमित्रा जाधव, प्रकाश भोयर आदी उपस्थित होते.
उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूर शहराचा अपेक्षित विकास झाला नसल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने मिहानसह विविध योजनांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना दिली आहे.शहराच्या सर्वंच भागात मोठया प्रमाणात विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेसह सुरु असलेल्या कामामुळे रस्ते खोदून ठेवले आहे. येत्या तीन वर्षात ही सर्व कामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जनतेला सर्व सुविधा उपलब्ध होतील. या विकासकामासाठी जनतेचा सहभाग मिळविण्यासाठी कामाच्या कालमर्यादेचे माहिती फलक प्रत्येक ठिकाणी लावण्यात यावे व कामांचा दर्जा कायम राहावा, यासाठी नागरिकांची समिती तयार करावी अशी सूचना यावेळी केली.
झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क
झोपडपट्टयांनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करतांना अनेक अडचणी होत्या. परंतु सुलभपणे मालकी हक्काचे पट्टे मिळावे, यासाठी शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आला असून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नवीन नियमाप्रमाणे मालकी हक्काचे पट्टे वाटप तात्काळ वाटप करावे, अशी सूचना करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अविकसित लेआऊट मध्ये रस्ते, पाणी, वीज आदी मुलभूत सुविधा पुरविणाऱ्याला प्राधान्य देण्यात आले असून रस्ते विकासासाठी 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
समाधान शिबिराच्या माध्यमातून जनतेच्या अडचणी व तक्रारी सोडविण्यास मदत होत असल्यामुळे मुख्यमंत्री समाधान शिबिर ही योजना जोमाने राबवून या योजनेच्या माध्यमातून सोळा वेगवेगळया सेवा व प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येईल. शासन आपल्या दारी ही संकल्पना आता मतदार संघाऐवजी प्रत्येक भागात तसेच वार्डात सुरु करण्यात येऊन योजनांचा लाभ व सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल करणार
नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा घरपोच मिळाव्यात यासाठी नागपूर जिल्हा हा 2 ऑक्टोबर पर्यंत डिजीटल जिल्हा करण्यात येणार आहे.या अंतर्गत सर्व ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबरने जोडण्यात येऊन शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा ऑनलाईन उपलब्ध होतील. जिल्हयात 350 सेवा 2 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन करुन या संपूर्ण सेवा मोबाईल ॲपवर उपलब्ध होणार असल्यामुळे जनतेला यापुढे शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
डिजीटल क्रांतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील सेवा व सुविधा यामध्ये फरक राहणार नाही. 11 हजार डिजीटल शाळामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी पालकांची संख्या वाढत आहे.
दिव्यांगांना साहित्याचे वाटप
समाजातील विविध घटकातील दिव्यांगांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी 354 दिव्यांगांना विविध वस्तू व साहित्याचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये अस्थिव्यंग अपंगत्व असलेल्यांना स्वयंचलित ट्रायसिकल, व्हिल चेअर आदी साहित्य, कृत्रिम अवयव व कॅलिपर्स, त्यानंतर मतीमंद व कर्णबधिर अपंगांना एमआर किट, ऐकण्याची मशीन तसेच अंध व अल्प दृष्टी धारकांना आवश्यक साहित्य त्यासोबतच अपंगत्व प्रमाणपत्र, अपंग वित्त, व विकास महामंडळातर्फे कर्ज पुरवठा, 20 झेरॉक्स मशीनचे वाटप आदी साहित्यांचे वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांगांना विविध साहित्यांचे वाटप केल्यानंतर सर्व अपंगांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.
चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाठी शासनाने प्रथमच मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे शहराच्या सर्वच भागात विकासकामांना सुरुवात झाली असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शहरातील अंतर्गत रस्ते व रिंग रोडसाठी प्रत्येकी 300 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. दक्षिण-पश्चिम मतदार संघात रस्ते पाणी वीज आदी मुलभूत सुविधासाठी 200 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ होत आहे.
शहरात राहणाऱ्या नागरिकांना चांगल्या मुलभूत सुविधा मिळाव्यात तसेच दक्षिण-पश्चिम मतदार संघातील रस्ते विकासासाठी 120 कोटी रुपये आवश्यकता असून हा निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्याची मागणी करतांना ते पुढे म्हणाले की, आरक्षणाच्या माध्यमातून रस्त्यामध्ये येणाऱ्या सुमारे आठ हजार परिवारांचे घरे वाचविण्याचे महत्वपूर्ण काम करण्यात आले आहे.
दक्षिण- पश्चिम मतदार संघातील संपूर्ण विद्युत लाईन भूमिगत करण्यात आले. वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून 118 कोटी रुपये खर्चाचा स्मार्ट ग्रिडचा प्रकल्प मंजूर झाला आहे. नागपूर शहर हे एज्युकेशन हब म्हणूनही विकसित होत असून दीक्षाभूमी, चिंचोली व ड्रॅगन पॅलेसला निधी देऊन बुद्ध सर्कीट म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक प्रकाश भोयर यांनी तर आभार प्रदर्शन संदीप जोशी यांनी मानले. संचलन श्रीमती नंदा जिचकार यांनी केले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त माधव झोड, मुख्यमंत्री सचिवालयाच्या श्रीमती आशा पठाण,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता प्रशांत रेशमे तसेच दिलीप दिवे, संजय भेंडे, अनिल वाहने, किशोर वानखेडे, गिरीश देशमुख, गोपाल बोहरे, आशिष पाठक, सचिन कारलकर, श्रीपाद बोरीकर आदी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment