Sunday, 11 September 2016

नागपूरला स्मार्ट सिटी बनविणार -मुख्यमंत्री

  • शहरातील रस्त्यांचे तीन वर्षात सिमेंटीकरण
  • नागपूर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल होणार
  • डिजिटल शाळांमूळे जिप शाळातील विद्यार्थ्याच्या संख्येत वाढ

नागपूर दि. 11 :- नागपूर शहराला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती या चर्चासत्राच्या निमित्ताने एकत्र येऊन नागपूर शहर विकासाचे प्रश्न आणि आवाहने यावर चर्चा करीत आहे. ही स्वागतार्ह बाब आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केले.
नागपूर मनपा व नासूप्र व्हीजन 2020 च्या दैनिक लोकमत तर्फे कामठी रोडवरील ईडन ग्रीन्ज येथे आयोजित महाचर्चा कार्यक्रमाचे उद्वघाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,महापौर प्रविण दटके,या चर्चासत्राचे आयोजक माजी खासदार विजय दर्डा,लोकप्रतिनिधी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योगपती उपस्थित होते.
महाराष्ट्र हे 50 टक्के शहरीकरण झालेले राज्य आहे. पुर्वी ग्रामीण भागात जनता मोठया संख्येने रहात होती. परंतू रोजगाराच्या निमिताने येणाऱ्या व्यक्तीमुळे शहरे वाढायला लागली . शहराच्या भोवताल असणाऱ्या शेत जमिनीमध्ये वस्त्या आकारास आल्या. त्यांना नागरी सुविधा देणारी व्यवस्था मात्र निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे नागपूर शहरातच 5 हजार अनधिकृत ले-आऊटस तयार झाले. शहराची वाहतूक,आरोग्य व पाणीपुरवठा सेवा जलद गतीने पूरविण्यासाठी नागपूर महानगरपालिका वेगाने पावले उचलीत आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
नागपुरात मोठया प्रमाणात केंन्द्रीय कार्यालये आहेत. येथे नोकरी करणारा अधिकारी निवृत्त झाल्यानंतर येथेच स्थानिक होतो. त्यामुळे नागपूर शहराला मिनी इंडियाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे आपण मेट्रो रिजन, नवीन नागपूर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. रोजगार व आर्थिक सोयीसुविधा निर्माण करतांना त्या एकाच ठिकाणी न होता शहराच्या सभोवताल होणे गरजेचे आहे. कारण शहरात कामाला येणारा व्यक्ती जर खूप दूर राहात असेल तर त्याला वाहतूक सुविधाही मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी मेट्रो व बस व्यवस्थाही तेवढीच वेगवान असण्याची गरज आहे. मुंबईत अशा प्रकारची एकमेकांना जोडणारी वाहतूक व्यवस्था निर्माण  करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. प्रवाशाने एकदा तिकिट काढलेकी त्या तिकिटावर बस,रेल्वे,टॅक्सी असा प्रवास करता येणे शक्य होईल. यासाठी ई-तिकीटचा प्रयोग करण्याचा विचार आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपण जेवढी शहरे विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तेवढेच प्रयत्न ग्रामविकासासाठी करीत आहोत.नागपूर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती 2 ऑक्टोबरपासून डिजिटल होत आहे. त्याचा फायदा आरोग्य सुविधा नवे तंत्रज्ञान, शाळेतील मुलांना निश्चितपणे फायदा होणार आहे. जिल्हापरिषद शाळा या डिजिटल झाल्यामुळे खाजगी इंग्रजी शाळेतून राज्यातील 22 हजार विद्यार्थी परत जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या योजने अंतर्गत 17 हजार शाळामधील विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा दर्जा उंचावला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सागितले आहे.
नागरिकांना यापुढे समाधान शिबिरातून डिजिटल सेवा देण्यात येतील अशा प्रकारची 30 हजार सेवा केन्द्रे राज्यात सुरू करण्यात येणार आहे. यापुढे कुठलेही प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नागपुरातील रस्ते खड्डे मुक्त असावे यासाठी सिमेंटचे रस्ते बांधण्यात येणार आहे. दरवर्षी 300 कोटी रूपये यासाठी खर्च करण्यात येतील. येत्या तीन वर्षात ही कामे पूर्ण होतील. यापैकी सावरकरनगर चौक ते उच्च न्यायालयापर्यंतचा 6 किलोमीटर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. भविष्यात रस्ते खड्डे मुक्त होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही सुधारेल अशी मुख्यमंत्र्यांनी खात्री दिली.
नागपूर महानगरपालिका शहरातील सांडपाण्याचे शुध्दीकरण करून 200 MLD पाणी महाजेनकोला वीज निर्मितीसाठी विकत आहे. शहरात गेल्या 4 वर्षापासून अखंडित पाणीपुरवठा 24X7 या योजनेअंतर्गत देत आहे. याचा फायदा लाखो लोकांना होत आहे. पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात आल्याचे मुखमंत्र्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी राजकीय मतैक्य होणे हेसुध्दा तेवढेच गरजेचे आहे. नागनदी शुध्दीकरण हा महत्वाकांसी प्रकल्प आहे. मनपाने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. यात लोकांना सहभागही तेवढाच महत्वाचा आहे. शहराला स्वच्छ ठेवण्याची जवाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. नागपूर सुधार प्रशासने कमी दरात 1 लाख घरे बांधण्याची संकल्प केला आहे. त्यामुहळे झोपडपट्टयांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सागितले.
भविष्यात नागपूर हे लॉजिस्टिक हब होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू या शहरातील कचऱ्याची विल्हेवाट असो, स्वच्छ पाणी पुरवठा असो, की वाहतूक व्यवस्था असो त्या चांगल्या पध्दतीने कशा पुरविता येतील याचा सर्वानीच विचार करावा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.
सुरूवातीला माजी खासदार विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात नागपूर शहराती सर्वसामान्य जनतेला भेडसावणाचा समस्या सांगितल्या त्यात वाढणाचा झोपडपट्टय, पिण्याचे पाणी, वाहतूक, प्रदुषण या समस्यांचा उल्लेख केला.
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी प्रथम माजी मंत्री व लोकमत दैनिकाचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन आपली आदरांजली वाहिली. या चर्चासत्राचे संचालन  दैनिक लोकमतचे शहर आवृती प्रमुख गजानन जानभोर यांनी केले.
यावेळी आमदार सर्वश्री अनिल सोले,सुधाकर कोहळे,जोगेन्द्र कवाडे,प्रकाश गजभिये,सुधाकर देशमुख,विकास कुंभारे, पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर,चंद्रपाल चौकसे, माजी आमदार एस. क्यु. जमा इतर सन्माननीय नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment