मुंबई, दि. 31 : उच्च न्यायालयाचे कायमस्वरुपी खंडपीठ कोल्हापूर आणि पुणे येथे व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असून जोपर्यंत कायमस्वरुपी खंडपीठ होत नाही तोपर्यंत फिरते खंडपीठ स्थापन करण्यात यावे. यासाठी मा. उच्च न्यायालयाकडे यांच्याकडे विनंती करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
या संदर्भातील लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य राजेश क्षीरसागर यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरिता कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात न्यायमूर्तींनी मुंबई उच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींची समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. कायमस्वरुपी खंडपीठ होत नाही तोपर्यंत पुणे आणि कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ स्थापन करण्यात यावे, अशी विनंती मुख्य न्यायमुर्ती, मुंबई उच्च न्यायालय यांना करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय विधी व न्यायमंत्री आणि उच्च न्यायालय यांनाही खंडपीठ लवकर स्थापन व्हावे, यासाठी विनंती करण्यात येईल आणि राज्य शासनाकडून ज्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
या चर्चेत विधानसभा सदस्य सर्वश्री सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, आशिष शेलार, प्रकाश आबिटकर यांनी सहभाग घेतला.
०००००
No comments:
Post a Comment