Friday, 31 March 2017

असंघटित कामगारांसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 30 : राज्यातील विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करुन येत्या दोन महिन्यांत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य सुनिल शिंदे यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील सर्व क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करुन येत्या दोन महिन्यांत धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि यासाठी असलेला निधी खर्च करण्याची सूचना संबंधित विभागाला देण्यात येईल.
एका उपप्रश्नाला उत्तर देताना कामगार राज्यमंत्री विजय देशमुख म्हणाले की, राज्यातील विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी एकच सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात येईल. यामध्ये सर्व क्षेत्रातील कामगारांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या 122 विविध क्षेत्रांतील कामगारांची यादी तयार असून उर्वरित सर्वांचे नाव नोंदी लवकरच करण्यात येईल,  असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
या चर्चेत सदस्य सर्वश्री आशिष शेलार, भारती लव्हेकर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, मेधा कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला.
०००००

No comments:

Post a Comment