- नागरी सेवादिनाचे आयोजन
- उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
नागपूर, दि.21 : प्रशासनाचे मुल्यमापन हे जनतेला दिलेल्या सेवेवरुन होत असते. त्यामुळे सूलभ व जलद सेवा देवून प्रशासन अधिक लोकाभिमूख असावे, नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात उत्कृष्ट प्रशासनाचा नावलौकिक मिळविला आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकराव्या नागरी सेवादिना निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
सेंट ऊर्सूला शाळेच्या सभागृहात जिल्हा प्रशासनतर्फे नागरी सेवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उपजिल्हाधिकारी ते वाहन चालकांपर्यत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर मेट्रोपॉलीटन रिजन डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे, उपजिल्हाधिकारी एन. के. राव उपस्थित होते.
काम कोणतेही असो उत्कृष्ट झालेच पाहिजे असा एकच ध्यास घेवून काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक व्हायला पाहिजे. आणि हा कौतुकाचा दिवस म्हणजे नागरी सेवा दिन होय असे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शासन आणि जनता यांच्यात दुवा साधण्याच काम शासकीय अधिकारी करत असतात. त्यामुळे प्रत्येक काम जबाबदारी व प्रामाणिकपणे पुर्ण करणे आवश्यक आहे. नागपूर जिल्हा प्रशासन अतिशय उत्तमरीत्या काम करीत असल्याने नागपूर जिल्ह्याचा विकास निश्चितच होणार असेही ते म्हणाले.
जिल्हा प्रशासनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्हाधिकारी यांच्या चमूने लोकाभिमूख प्रशासनाची ओळख निर्माण केली असून जनतेलाही चांगल्या सेवा मिळत असल्यामुळे ऊर्जा मंत्री म्हणून जिल्हयाऐवजी राज्याच्या कामांमध्ये अधिक लक्ष देणे सूलभ होत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्याकरिता जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सर्वोष्कृष्ट काम केले. त्याबद्दल त्यांचे व संपूर्ण चमूचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले.
नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. उपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जयभाये, मौदा तहसीलदार चंद्रभान खंडाईत, तहसीलदार श्रीमती प्रियदर्शनी बोरकर, काटोल तहसिलदार रमेश कोळपे, अव्वल कारकुन ओमप्रकाश द्वारमवार, रामटेकचे मंडळ अधिकारी महेश पुल्लीवार, सावनेरचे कनिष्ठ लिपीक विनोद शेंबेकर, कामठी तलाठी श्री बोरोकर, शिपाई प्रदीप कोल्हे, वाहनचालक कमलेश पाटील, हिंगला येथील कोतवाल प्रकाश वासेकर, लघुटंकलेखक संजय गिरी यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नागरी सेवा दिनानिमित्त मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंजुषा सावरकर यांनी तर, आभार उपजिल्हाधिकारी एन. के. राव यांनी मानले.
0000000
No comments:
Post a Comment