मुंबई, दि. 30 : जीएसटी कर रचनेंतर्गत गुळाचा सध्याचा ‘अकृषिक उत्पादन’ (नॉन अग्रीकल्चर प्रोड्युस) दर्जा वगळून कृषिउत्पादन असा करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.
यासंदर्भात श्री. खोत यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये श्री. खोत यांनी नमूद केले आहे की, केंद्र शासनाने दि. 15 नोव्हेंबर 2017रोजीच्या परिपत्रकानुसार गुळाला शेतमालातून वगळले असल्याने त्यावर जीएसटी लावण्यात आला आहे. जीएसटी लावल्याने शेतकऱ्यांना कमी दर मिळणार असून ग्राहकांनाही जादा दराने गुळ घ्यावा लागू शकतो. शेतकरी स्वतःच्या शेतात गुऱ्हाळे किंवा खांडसरी चालवून ऊसापासून गुळाचे उत्पादन करतात. गूळ उत्पादनासाठी ते कोणत्याही कंपनीकडे ऊस पाठवत नाहीत. त्यामुळे गुळाचा समावेश कृषीमालातच व्हावा.
गुळाचा समावेश कृषीमालात करण्याबाबत केंद्र शासनाकडे विनंती करावी अशी मागणी देखील श्री. खोत यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
००००
No comments:
Post a Comment