मुंबई, दि. 28 : क्षयरोगासंदर्भात अधिकचे संशोधन करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. क्षयरोग तपासणीसाठी मुंबईत तीन प्रयोगशाळा सुरूअसून आणखी दोन सुरु करण्यात येणार आहेत असे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य पराग आळवणी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना आरोग्यमंत्री बोलत होते.
आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात एकूण नोंदविलेल्या क्षयरुग्णांपैकी साधारणात: 18 ते 20 टक्के रुग्ण मुंबईत आढळून येतात. क्षयरोगाच्या संनियंत्रणासाठी मुंबई शहरात स्वतंत्र 24 जिल्हा क्षयरोग केंद्र आहेत. राज्यात 517 क्षयरोग उपचार पथके असून मुंबईत 59 पथक कार्यरत आहेत. संशयित रुग्णांच्या थुंकी नमुना तपासणी राज्यभरात 1520 सुक्ष्मदर्शी केंद्र असून त्यातील 130 केंद्र मुंबईत आहेत.
नियमित औषधोपचारास जे रुग्ण दाद देत नाहीत अशा एमडीआर, एक्सडीआर बाधीत रुग्णांची प्रयोगशाळा तपासणीसाठी राज्यात 12 कल्चर ॲण्ड डीएसटी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी मुंबईत पाच ठिकाणी या प्रयोगशाळा केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जे. जे. रुग्णालय, हिंदुजा हॉस्पीटल, जीटीबी हॉस्पीटल, मेट्रोपॉलीस हेल्थकेअर लॅबोरेटरी व एसआरएल येथे प्रयोगशाळा मंजूर झाल्या आहेत त्यातील जे.जे. आणि हिंदुजा येथील प्रयोगशाळा कार्यरत असून सहा महिन्यात उर्वरित प्रयोगशाळा सुरू होतील.
या रोगाचे निदान लवकर होण्याकरिता राज्यात एकूण 117 सीबीनॅट यंत्रे उपलब्ध असून त्यापैकी मुंबईत 28 यंत्रे आहेत. राज्यात क्षयरोग संशयितांची मोफत एक्सरे तपासणी केली जाते, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईसह राज्यभरात क्षयरोगासंदर्भात घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यावर भर दिला जात आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी चारसुत्री पद्धतीने कार्यक्रम राबविला जात आहे. मुंबई शहरात पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये क्षयरुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगून आरोग्यमंत्री म्हणाले की, प्रदुषणामुळे होणाऱ्या क्षयरोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे विशेष नेमून त्याद्वारे तपासणी करण्यात येईल. बुलढाण्याचे क्षयरोग रुग्णालय येत्या सहा महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल. असे त्यांनी यावेळी झालेल्या चर्चेतील एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, अजित पवार, नसीम खान, अतुल भातखळकर, सुनिल प्रभू, अबु आझमी, डॉ. राहूल आहेर, डॉ. सुजित मिनचेकर आणि श्रीमती वर्षा गायकवाड यांनी भाग घेतला.
०००
No comments:
Post a Comment