* 600 विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण
व धनादेश वाटप
* महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे आयोजन
नागपूर, दि. 1 : विद्यार्थ्यांनी
कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगारास प्राधान्य द्यावे. महात्मा फुले
मागासवर्ग विकास महामंडळाच्या सुरु असलेल्या विविध योजनांचे स्वरुप बदलून जास्तीत-जास्त
विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल तसेच मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हमीचे
प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले
म्हणाले.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कौशल्य विकास
प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत अनुसूचित जातीच्या 600 विद्यार्थ्यांनी
प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री राजकुमार बडोले
यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृह येथे महात्मा
फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने धनादेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात
आला. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची विशेष उपस्थिती होती. महात्मा
फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गेडाम,
सर्वश्री आमदार अनिल सोले, मल्लिकार्जुन रेड्डी,
संत रोहीदास चर्मकार विकास महामंडळ मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक राजेश ढाबरे, समाज
कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, महात्मा फुले मागासवर्ग विकास
महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धार्थ खोब्रागडे आदी उपस्थित होते.
नागपूर विभागात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत
मागील 6 वर्षात 3 हजार 487 लाभार्थ्यांना
333.70 लक्ष रुपयाचे अनुदान तसेच 220.48 लक्ष
रुपये कर्ज स्वरुपात वितरित करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने अनुदान व कर्ज म्हणून
559.18 लक्ष रुपयाचे वाटप करण्यात आले आहे. मागील 6 वर्षात 3 हजार 360 विद्यार्थ्यांना
कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ देण्यात आला आहे. याकरिता 270.78 लक्ष रुपये खर्च करण्यात
आले आहेत, अशी माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक
योगेश्वरी शहारे यांनी दिली.
व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गेडाम यांनी संधीचा लाभ घेत
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
****
No comments:
Post a Comment