प्राचीन संस्कृतीमुळे भारतीय संस्कृती अबाधित
सोलापूर दि. 27 : भारतावर अनेक आक्रमणे होवूनही प्राचीन परंपरांमुळेच भारताची
संस्कृती टिकून आहे. देशातील विविध मठ संस्कार व शिक्षण प्रसार करण्याची ठिकाणे
आहेत, देशातील सर्व समाज एकसंघ
ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
येथील अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदिरात श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या
श्री संकल्पसिध्दी कार्यमहोत्सव २०१८ अंतर्गत वीरशैव लिंगायत
संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष
देशमुख, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सिध्दराम म्हेत्रे, डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामी, श्री श्री श्री १००८ उज्जयनी जगदगुरू, श्री श्री श्री १००८ श्रीशैल जगदगुरू, श्री श्री श्री १००८ काशी जगदगुरू उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, कोणत्याही संकल्पाची पूर्ती ही आपली भारतीय
संस्कृती आहे. होटगी मठाचे शिवाचार्यानी श्री श्री श्री १००८ जगदगुरु
भगवतपाद यांची १०८ फुट उंच मुर्तीचे
लोकार्पण व १००८ शिवलिंगांची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा संकल्प
सोडला होता. हा संकल्प पूर्ण होईपर्यंत केवळ पाण्यावर राहण्याची कडक उपासना
त्यांनी केली. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते अडीच वर्ष केवळ पाण्यावर राहिले.
त्यांच्या पश्चात त्यांचा संकल्प त्यांच्या शिष्यांनी आणि समाजबांधवांनी पूर्ण
केला ही मोठी उपलब्धी आहे.
देशातील मठांना ऐतिहासिक वारसा आहे. या मठातून शिक्षण आणि संस्कार देण्याचे
काम चालते. होटगी मठालाही शिक्षण प्रसाराची मोठी परंपरा आहे. प्राचिन परंपरांमुळेच
देशाची संस्कृती टिकून आहे. मठांच्या माध्यमातून समाज एकसंध ठेवण्याचे काम चालते.
देशाच्या प्रगतीसाठी समाजातील दरी कमी होवून समाज एकसंध राहण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
श्रध्दा टिकली तरच देशाची अखंडता टिकणार आहे. समाजाला एकसंध ठेवण्याची
सर्वांची जबाबदारी आहे. लिंगायत समाजाला इतर मागासवर्गीयांच्या सवलती मिळूवन
देण्यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्न करणार आहे. त्याच बरोबर बसवेश्वर
महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने पावले उचलणार असल्याचे
त्यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘संकल्प सिध्दीला आपल्या संस्कृतीत मोठे महत्व आहे. गुरुंनी केलेला संकल्प
यानिमित्ताने सर्व शिष्यांनी व समाजाने सिध्दीला नेला आहे. समाजाच्या उत्थानासाठी
हे अत्यंत महत्वाचे आहे’.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, बृहन्मठ होटगी मठाला प्राचिन इतिहास आहे. या मठाला अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा आहे. समाजाच्या
उन्नतीसाठी या मठाच्या माध्यमातून काम सुरू आहे. योगीराजेंद्र शिवाचार्य
महास्वामींच्या संकल्पाची आज संकल्पपूर्ती होत आहे. शासनाच्या माध्यमातून सोलापूर
जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास सुरु आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते श्री श्री श्री १००८ जगदगुरू पंडिताराध्य भगवतपाद यांच्या १०८ फूट उंच मुर्तीचे लोकार्पण आणि
१००८ शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना समारंभ पार पडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘संकल्प सिध्दी’ विशेषांकाचे
प्रकाशन करण्यात आले. यावेळी होटगी मठ आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्यावतीने
आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यातील वधू-वरांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी
आशीर्वाद दिले.
यावेळी माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रे, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचे भाषण
झाले. या संमेल्लनाला राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील वीरशैव समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment