मुंबई दि. 1 – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अभिवादन केले आणि कामगार व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार या अभियानास लोकसहभागाची जोड मिळाल्यामुळे विकास वेगाने होत असल्याचा अनुभव आपल्याला येत आहे. राज्याची परिस्थिती लक्षात घेवून पाण्याचा अपव्यय टाळावा व उपलब्ध जलसाठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी जलसाक्षरता संकल्पना राबविण्यासाठी कटिबद्ध होऊ या असे आवाहन श्री. नाईक-निंबाळकर यांनी यावेळी केले.
58 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवनाचा आसमंत सनई-चौघडा व तुतारीच्या निनादाने मांगल्य आणि उत्साहाने बहरून गेला होता. या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सदस्य संजय दत्त, नरेंद्र पाटील, तसेच विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सहसचिव अशोक मोहिते, उपसचिव विलास आठवले आदींसह अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यावेळी मानवंदना दिली.
०००
No comments:
Post a Comment