Wednesday, 30 May 2018

हरित नव महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी वृक्षलागवडीच्या वन आंदोलनात सहभागी व्हा - सुधीर मुनगंटीवार








* 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा
* विभागात 2 कोटी 62 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
* 1 ते 31 जुलैपर्यत विशेष वृक्षलागवड मोहिम
* राज्यात 1 कोटी बांबूची लागवड


                नागपूर दि.30 : माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यत अनेकार्थाने उपयुक्त वृक्षसंपदेचे अस्तित्व जपण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग देण्याचे आवाहन करतांनाच हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी 13 कोटी वृक्षलागवडीच्या विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
वनामती येथे नागपूर विभागात राबविण्यात येत असलेल्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिम तसेच पूर्व तयारीचा आढावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. त्याप्रसंगी आवाहन करतांना ते बोलत होते. नागपूर विभागाला 2 कोटी 62 लक्ष 65 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून वृक्षलागवडीच्या विशेष मोहिमेत विविध विभागांना दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे वृक्षारोपण करण्यासंदर्भात त्यांनी आढावा घेतला. 
यावेळी खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री नाना शामकुळे, आशिष देशमुख, समीर कुणावार, कृष्णा गजबे, ॲड. संजय धोटे, गिरीष व्यास, प्रकाश गजभिये, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, चंद्रपूरच्या महापौर अंजली धोटेकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, सामाजिक वनिकरण विभाग प्रधान मुख्य वन संरक्षक (पुणे) अनुराग चौधरी, प्रधान मुख्य वन संरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन, नागपूर) शेषराव पाटील, मुख्य वन संरक्षक नागपूर संजीव गौर, सामाजिक वनिकरण वनसंरक्षक अशोक गिऱ्हेपुजे आदी उपस्थित होते. 
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राच्या गैर वनक्षेत्रात 273 चौरस किलोमीटर क्षेत्रात, वृक्षाच्छादित पट्टा निर्माण झाला असल्याचे सांगण्यात आले असून देशात वृक्षाच्छादित पट्टा निर्माण करण्यात संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगतांना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन तसेच संगोपनाचे काम केवळ शासनाचे नव्हे या वृक्षारोपण मोहिमेत सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. ही मोहिम वन सत्याग्रह म्हणून राबवितांनाच हरित नव महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
वृक्षारोपण मोहिम ही अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याचे सांगतांना वनमंत्री म्हणाले की, वृक्षारोपणासंदर्भातील संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने सर्व जनतेसाठी उपलब्ध राहणार आहे. 2 कोटी वृक्ष लागवड करतांना विभागाला 67.90 लाखाचे उद्दिष्ट दिले होते, प्रत्यक्ष 68.30 लाख वृक्ष लागवड यशस्वीपणे पूर्ण केली. त्यापैकी 81 टक्के वृक्ष जीवंत आहेत तसेच 4 कोटी वृक्ष लागवड मोहिम राबवितांना नागपूर विभागाला 1 कोटी 36 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी 70 टक्के जीवंत वृक्षाचे प्रमाण आहे. वृक्षलागवड मोहिम राबवितांना प्रत्येक वृक्ष संगोपन ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. जेथे जागा उपलब्ध असेल तेथे ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्याने अत्यंत कल्पकतेने 13 कोटी वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे. त्यानुसार ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाने एकत्र येऊन एक महिन्यात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले. खड्डे खोदण्यापासून तर वृक्षांच्या उपलब्धतेपर्यतची तयारी पूर्ण करावी असे आवाहन यावेळी वनमंत्र्यांनी केले.
राज्याचे 33 टक्के वृक्षाच्छादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी फक्त वन विभागाच्याच जमीनीवर वृक्ष लागवड करून उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. त्यासाठी वनेत्तर जमीनीवर सुद्धा वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. कुटूंबात जन्म झाल्यास शुभेच्छा वृक्ष, लग्न असल्यास शुभमंगल वृक्ष, परीक्षा पास झाल्यास, नोकरी लागल्यास आनंद वृक्ष, सासरी जाणाऱ्या मुलींसाठी माहेरची साडी वृक्ष आणि कुणाचा मृत्यु झाल्यास स्मृती वृक्ष लावण्यात येणार आहे. 1 जुलै पासून सुरु होणाऱ्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेमध्ये सुख-दुखात वृक्षाची साथ हा उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे. प्रसंगानुसार गेल्या एक वर्षात जन्मलेल्या किंवा मृत्यु झालेल्या कुटुंबियांना रोपटे देऊन या मोहिमेत सहभागी करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
13 कोटी मोहिमेंतर्गत नागपूर विभागाला 2 कोटी 62 लक्ष 65 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी नागपूर जिल्ह्याला 43 लाख 44 हजार, वर्धा 33 लाख 07 हजार, भंडारा 24 लाख 59 हजार, गोंदिया 34 लाख 60 हजार, चंद्रपूर 77 लाख 21 हजार तर गडचिरोली जिल्ह्याला 50 लाख 74 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्षलागवडीसाठी 19 हजार 731 जागा निवडण्यात आल्या असून त्यावर 1 कोटी 54 लाख 85 हजार खड्डे खोदण्यात आले आहे. वृक्षलागवड मोहिमेसाठी 3 कोटी 62 लाख 71 हजार वृक्ष उपलब्ध असल्याचे यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी सांगितले.
वृक्षलागवड मोहिम राबवितांना नदी काठावर वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून त्यासाठी वन विभागाने 1 हजार 170 किलोमीटर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच शासकीय जागेवर 2 हजार 920 हेक्टर तर खाजगी जागेवर 15 हजार 204 हेक्टर वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. वृक्ष लागवडी मोहिमेंतर्गत हरित सेनेचा सहभाग महत्वपूर्ण असून विभागात आतापर्यत 5 लाख 81 हजार 879 सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे.
झाडे लावण्याची व त्यांना जगविण्याची आस्था प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्या आस्थेला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची जबाबदारी सर्व विभागांची असून या मोहिमेमध्ये सर्वांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण हे जनआंदोलन व्हावे या दृष्टीने या मोहिमेची आखणी करण्याच्या सूचना यावेळी वनमंत्र्यांनी दिल्या. राज्यात 1 कोटी बांबूची लागवड करण्यासोबतच बांबू संशोधनासोबतच रोजगाराचे प्रमुख साधन म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी अमरावती, औरंगाबाद व राहुरी विद्यापीठात बांबू सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे सांगतांना राज्यात 4 हजार 465 चौरस हेक्टर क्षेत्र वाढल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
उपजिविकेवर आधारित वृक्ष लागवडीला महत्त्व
विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी विभागातील वृक्ष लागवड मोहिमेच्या पूर्व नियोजनाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून विभागाने 93 टक्के रोपट्यांचे संगोपन केले आहे. यावर्षी विभागास 2 कोटी 62 लक्ष 65 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. विभागात उद्दीष्ट पूर्तीसाठी 3 कोटी 62 लक्ष 71 हजार रोपटे उपलब्ध आहेत. याशिवाय विभागात 5 लक्ष 82 हजार हरित सेना सदस्य नोंदणीचा लक्ष्य साध्य करण्यात आला आहे. नागपूर विभागात राबिण्यात येणाऱ्या महावृक्षलागवड मोहिमेमध्ये उपजिविकेचे साधन म्हणून उपयोगात येणाऱ्या वृक्षांचा समावेश करण्यात यावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्याने मांडला आढावा
आढावा बैठकीत 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जिल्हानिहाय नियोजनाची माहिती सादर करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जनजागृतीसह 15 जून पासून एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने एक कर्मचारी तीन रोपटे तसेच वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ऑक्सीजन पार्कची संकल्पना राबिवण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक संस्थेच्या मदतीने वर्धा जिल्ह्यात झाडांचे गाव हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात माझी कन्या भाग्यश्री बालोद्यान तसेच गोंदिया जिल्ह्यात तलाव काठी वड, पिंपळ व उंबराच्या झाडाचे रोपण करण्यात येणार असल्याचे संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. 
वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षारोपण मोहिमेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखविली. ग्रामीण भागात तसेच नागरी भागातही 13 कोटी वृक्षारोपण मोहिमेबद्दल जनजागृती करण्यासाठी वन विभागाने विशेष मोहिम सुरु केली आहे. प्रदुषण मुक्त महाराष्ट्र, क्लीन सिटी सोबत ग्रीन सिटी साकारण्यासाठी जनतेचा सहभाग वाढविण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. प्रारंभी मुख्य वनसंरक्षक संजीव गौर यांनी रोपटे देऊन सर्वाचे स्वागत केले. लोकप्रतिनिधिनींही या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व जनतेचा सहभाग मिळविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. 
*****

No comments:

Post a Comment