* अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत विशेष नोंदणी अभियानाचा शुभारंभ
* दुस-या टप्प्यात 12 जिल्ह्यांचा समावेश
नागपूर, दि.4 : कामगारांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र या योजनांची माहिती कामगारांना नसल्यामुळे अनेक कल्याणकारी योजनांपासून ते वंचित राहतात. कामगार कल्याण विभाग हा समाजाच्या शेवटच्या घटकातील लोकांना न्याय देणारा विभाग आहे. त्यामुळे विभागाच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवा, अशा सुचना कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सुचना केंद्रात अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानाच्या दुस-या टप्प्याचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी उर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार मिना,कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम, कामगार विकास आयुक्त पंकज कुमार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, सचिव श्रीकृष्ण श्रीरंगम,अपर कामगार आयुक्त विजयकांत पानबुडे आदी उपस्थित होते.
कामगार विभागाच्या अधिका-यांनी नोंदणी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय चांगले काम केले असे सांगून कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, विशेष नोंदणी अभियानाच्या दुस-या टप्प्यात 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 4 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत 2.60 लक्ष कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. राज्यात सुरवातीला केवळ 3 लक्ष कामगारांची नोंदणी होती. आजघडीला संपूर्ण राज्यात 9 लक्ष कामगारांनी नोंदणी केली आहे. समाजातील शेवटच्या घटकातील लोकांना न्याय देणारा हा विभाग आहे. जिल्ह्यातील अधिका-यांनी प्रत्येक कामगारांपर्यंत पोहचून त्यांची नोंदणी करावी. मनरेगा अंतर्गत काम करणा-या कामगारांच्या याद्या घेऊन त्यांनासुध्दा नोंदणी अभियानात सामील करून घ्यावे. कामगार विभागामार्फत 28 कल्याणकारी योजनांचा कामगारांना लाभ देण्यात येतो. या कल्याणकारी योजनांची माहिती कामगारांपर्यंत पोहचवा, अशा सुचना त्यांनी केल्या.
यावेळी बोलतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नोंदणी अभियानाच्या माध्यमातून आपण तळागाळातील कामगारांपर्यंत पोहचत आहोत. उपेक्षित कामगारांना कल्याणकारी योजनांची माहिती द्या. नागपूर जिल्ह्यात जवळपास 53 हजार कामगार आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून 2.5 लक्ष रुपये आणि कामगार विभागाकडून 2 लक्ष असे एकूण 4 लक्ष रुपये घरकुलसाठी मिळणार आहे. कामगारांसाठी असलेल्या 28 योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवा. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी हा विभाग कार्यरत आहे. उर्जा खात्यातील 70 हजार कामगारांना या योजनेचा फायदा होईल. समाजातील एकही कामगार या नोंदणी अभियानापासून वंचित ठेवू नका, अशा सुचना त्यांनी केल्या.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले म्हणाले, कामगारांची नोंदणी हा राज्य शासनाने सुरू केलेला स्त्युत्य उपक्रम आहे. कामगारांच्या अनेक अडचणी असतात. त्यांना मदत देण्याचे शासनाचे धोरण आहे. पुढील एक महिन्यात जवळपास 2.60 लक्ष कामगारांची नोंदणी करण्यात येणार असल्यामुळे या कामगारांचे जीवन बदलणार आहे. कामगारांनी या नोंदणी अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव यांनी कामगारांसाठी राबविण्यात येणा-या 28 कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच 2016 च्या निर्णयानुसार कामगारांना देण्यात येणारा लाभ दुप्पट करण्यात आल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 23 फेब्रुवारी 2018 रोजी बांधकाम कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानाचा ई-शुभारंभ करण्यात आला होता. यात पहिल्या टप्प्यात मुंबई,पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश होता. या सहा जिल्ह्यात 2 लक्ष 24 हजार 577 कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. 4 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत राज्यातील 12 जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून यात अहमदनगर, नांदेड, रत्नागिरी, यवतमाळ, गोंदिया, सोलापूरसह इतर सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून विशेष नोंदणी अभियानाचा ई-शुभारंभ करण्यात आला. तसेच अरविंद रेवतकर आणि विनोद देवते यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येऊन त्यांना ओळखपत्र देण्यात आले. तसेच कामगार राजेंद्र कदम यांना अवजारे व बांधकामाकरीता हत्यारे घेण्यासाठी 5 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी अजाबराव ठोके आणि सुखचंद शरंगट यांच्या कुटुंबाकरीता शैक्षणिक लाभांतर्गत प्रत्येकी 10 हजार तर मंदा लांजेवार यांना 60 हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्रीकृष्ण श्रीरंगम यांनी केले. संचालन मानसी सोनटक्के यांनी तर आभार कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम यांनी मानले. यावेळी इतर कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment