Wednesday, 1 August 2018

पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




मुंबई, दि. 1 : शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंतदुप्पट करण्यासाठी पशुधन वाढीबरोबरच दूध, अंडी आणि लोकर उत्पादनात वाढ होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
ते आज मंत्रालयात आयोजित पशुसंवर्धन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला पदुम मंत्री महादेव जानकर, पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, तालुका पातळीवर युवकांना रोजगार मिळावा म्हणून पशुपालक उत्पादक कंपन्या स्थापन करण्यास प्रोत्साहन द्यावे. अशा युवकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून आर्थिक सहकार्य करावे. मराठवाडा विशेष पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यातील पशूधन विकासासाठी उपलब्धनिधीचा वापर करुन जालन्यात देशपातळीवरचे पशू प्रदर्शन घेण्याबाबत नियोजन करावे. मुख्यमंत्री पशुधन योजनेंतर्गत मागेल त्याला पशुधन देण्याबाबतची योजना ग्रामीण भागापर्यंत प्रभावीपणे राबवावी. चारायुक्त शिवार योजनेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच सेक्स सोर्टेड सिमेन लॅब स्थापन करण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
या आढावा बैठकीत गोवर्धन गोवंश योजना, विशेष दुधवाढ प्रकल्प, कुक्कुट विकास गटाची स्थापना, स्वयंम प्रकल्प, महामेष योजना, राष्ट्रीय गोकुळ मिशन, दुधाळ जनावरांचे वाटप, चारा निर्मिती, पशू वैद्यकीय सेवा, कृत्रिम रेतन, फिरते पशू वैद्यकीय चिकित्सालय, एकात्मिक पशू चिकित्सा केंद्र, सैन्यदलाकडील फ्रिजवाल जातीच्या गाईंचे संगोपन, शेळीपालन व कुक्कुट पालनाच्या माध्यमातून महिला बचतगटांचे सबलीकरण तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढण्याच्या दृष्टीने करावयाच्या विविध उपाययोजनेवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव किरण कुरुंदकर, आयुक्त कांतीलाल उमाप आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment