Thursday, 30 August 2018

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम - सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे




मुंबई, दि. 30 : पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात दि. 8 नोव्हेंबर 2018 पासून सुरु होत असून यानिमित्ताने वर्षभर विविध सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. पु. ल. देशपांडे यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व वेगवेगळ्या माध्यमातून या महोत्सवादरम्यान उलघडून दाखविण्याचा प्रयत्न आहे. या महोत्सवाची सुरुवात विलेपार्ले येथून होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
आज सह्याद्री अतिगृह येथे पु. ल. देशापांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सवासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार पराग अळवणी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक संजीव पालांडे आदी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले, पु. ल. देशापांडे, ग. दि. माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी  महाराष्ट्राला भरपूर काही दिले आहे. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेले काम नवीन पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी या तिन्ही महान व्यक्तींचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन वर्षभर करण्यात येणार आहे. पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करताना त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व समाजातील प्रत्येक व्यक्तींना कळावे, यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करण्यात येईल. तसेच या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सवात वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चित्ररथ आदींचे आयोजन करण्यात येईल, असे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.
००००

No comments:

Post a Comment