नवी दिल्ली, 10 : मुलांना घडविण्यात
मातेची भूमिका व मातृत्वाचे महत्व असा संदेश जगात देण्यासाठी चार
मातांनी आरंभिलेल्या ‘मदर्स ऑन व्हिल्स’ या प्रवासाला आज परराष्ट्र
व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी झेंडा
दाखवून सुरुवात केली.
येथील जवाहरलाल नेहरू भवनमध्ये
आयोजित कार्यक्रमात श्रीमती स्वराज यांनी कोल्हापूर येथील ‘फाऊंडेशन फॅार
होलिस्टीक डेव्हलपमेंट इन अकादमीक फिल्ड’ या संस्थेच्या ‘मदर्स ऑन व्हिल्स’ उपक्रमात सहभागी चार
महिलांची भेट घेतली व त्यांच्या योजनेबाबत
माहिती जाणून घेतली . पुणे येथील शितल वैद्य-देशपांडे आणि ऊर्मिला जोशी, ग्वाल्हेरच्या माधवी सिंग व दिल्लीच्या माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी धाडस दाखवून या उपक्रमात घेतलेल्या
सहभागाबद्दल श्रीमती स्वराज यांनी कौतुक केले व उपक्रम व प्रवासाच्या यशस्वीतेसाठी
शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी रविवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश
जावडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी या महिलांनी भेट घेतली. यावेळी श्री. जावडेकर
यांनी या महिलांना शुभेच्छा दिल्या.
२२ देशांमधून करणार
प्रवास
मातृत्वाचा संदेश देणा-या या
महिलांनी आजपासून दिल्लीतून कारद्वारे प्रवासास सुरुवात केली आहे. लाल रंगाच्या या
विशेष गाडीवर मातृत्वाचे विविध संदेश लिहीण्यात आले आहेत. ‘मदर्स ऑन व्हिल्स’ या उपक्रमांतर्गत या
महिला येत्या ६० दिवसांमध्ये एकूण २२ देशांचा प्रवास करून इंग्लड येथे पोहचणार
आहेत. २० हजार किलो मिटर पेक्षा जास्त
अंतराच्या या प्रवासात मुलांच्या व्यक्तीमत्व विकासात मातेचे योगदान आणि
मातृत्वाचे महत्व या विषयांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. मातृत्वाचा
संदेश देण्यासाठी चार आईंनी आरंभिलेल्या
विशेष उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
००००
No comments:
Post a Comment