वाशी येथे 8 हजार 750 रोजगार इच्छुकांची नोंदणी
ठाणे दि 8:- युवकांना मोठ्या प्रमाणावर
रोजगार देणारा इतका शिस्तबद्ध आणि पारदर्शी मेळावा देशातील कुठल्याही राज्यात होत
नसेल असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याविषयी
बोलतांना सांगितले. आज ते नवी मुंबई येथे सिडको प्रदर्शनी केंद्राच्या भव्य
सभागृहात आयोजित या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पुण्यानंतर नवी
मुंबईतील हा उद्योग विभागाचा दुसरा मेळावा होता, सुमारे 8 हजार 750 युवक युवतींनी
यासाठी नोंदणी केली होती तसेच 175 कंपन्यांनी यात सहभागी घेतला होता. सीआयआयने या
मेळाव्यासाठी सहकार्य केले.
आजच्या दिवशी नोंदणी केलेल्यांपैकी 4
हजार 707 उमेदवार उपस्थित होते, 3 हजार 306 मुलाखती होऊन 1602 जणांना ऑफर लेटर्स
देण्यात आली. उर्वरित जणांचे बायोडाटा संकलित करण्यात येऊन सीआयआयच्या
कार्यालयामार्फत विशेष कक्षातून इतर नोकऱ्यांमध्ये त्यांच्यासाठी संधी शोधण्यात
येईल.
या उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्री
एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य
कार्यकारी अधिकारी संजय सेठी, झोपडपट्टी पुनर्वसनचे विजय नाहटा आदींची उपस्थिती
होती.
सुभाष देसाई बोलतांना म्हणाले की, या मेळाव्यास
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यामागे उद्देश हाच आहे की बाळासाहेबांच्या
प्रेरणेतूनच मराठी तरुणांना नोकऱ्या देणारी चळवळ सुरू झाली. एअर इंडिया, रेल्वे, मोठ्या बहुराष्ट्रीय
कंपन्या अशा ठिकाणी नोकऱ्या मिळणे सुरू झाले आहे.
यापुढील काळात असे मेळावे घेण्यात
येणार असून प्रत्येक मेळावा चोख आणि पारदर्शी व्हावा असे नियोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात सहभागी युवकांना जागीच संबंधित कंपन्यांतर्फे मुलाखती घेऊन ऑफर लेटर्स
देण्यात येत असून ज्यांची निवड होणार नाही त्यांना पुढील काही दिवसांत उद्योग
विभागाच्या कार्यालयांत मुलाखती घेऊन त्यांना देखील उचित कंपन्यांत नोकरी मिळेल
यासाठी मार्गदर्शन केले जाईल असेही उद्योगमंत्री म्हणाले.
राज्यात गुंतवणूक वाढत असून नोकरीच्या
संधी देखील यामुळे वाढणार आहेत असेही ते म्हणाले.
ठाणे आणि कल्याणात देखील मेळावे
घ्यावेत
यावेळी बोलतांना पालकमंत्री एकनाथ
शिंदे म्हणाले की, एकीकडे देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असली असे
सांगितले जाते मात्र दुसरीकडे नोकऱ्या कमी होत आहेत. 30 लाखाहून अधिक पदवीधर
दरवर्षी नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडतात. स्थानीय लोकाधिकार समितीने भूमिपुत्रांना
नोकरी देण्याची चळवळ सुरू केली आणि आज या मेळाव्याच्या निमित्ताने नामांकित
कंपन्या आणि उमेदवार हे समोरासमोर एका छताखाली येऊन हे मेळावे यशस्वी करीत आहेत हे
मोठे यश आहे त्याबद्दल उद्योगमंत्री देसाई यांचे मी अभिनंदन करतो.
ठाणे आणि कल्याणात देखील असे रोजगार
मेळावे भरवावे अश्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी
बोलतांना, रोजगार इच्छुकांनी संकुचित वृत्ती सोडून आणि केवळ तात्कालिक विचार न
करण्याची भूमिका ठेवावी असे आवाहन केले. ते म्हणाले की, युवकांनी तंत्रज्ञानाचा अवलंब तर करावा
शिवाय संवाद कौशल्य आत्मसात करावे. देशातच नव्हे तर जगभर विविध काळांत, विविध कारणांमुळे
नेहमीच बेरोजगारीची समस्या राहिली आहे पण आपली युवकांत त्यावर मात करण्याची क्षमता
आहे, त्यादृष्टीने आपण विविध कौशल्येही अंगी बाणवावी.
प्रारंभी उद्योग विकास आयुक्त हर्षदीप
कांबळे यांनी बोलतांना ईझ ऑफ डूइंग बिझिनेसमुळे खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे
सांगितले.
उद्योग सहसंचालक शै गि राजपूत यांनी
आभार मानले. प्रारंभी शिवछत्रपती तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस
मान्यवरांनी पुष्पहार घातले.
उद्घाटनानंतर उद्योगमंत्र्यांनी
याठिकाणी असलेल्या विविध कंपन्यांच्या स्टॉल्सना भेटी दिल्या तसेच युवकांशी
संवादही साधला.
00000
No comments:
Post a Comment