मुंबई, दि. 30 : शब्दप्रधान गायकीचे महत्त्व जपणारे आणि मराठी भावसंगीतावर 'शतदा प्रेम' करायला लावणारे ज्येष्ठ संगीतकार, गायक, कवी, गीतकार पं. यशवंत देव यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावले आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यशवंत देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
संगीतकार यशवंत देव यांनी अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना संगीतबध्द केले. गेली अनेक दशके त्यांनी संगीत विश्वाला समृध्द केले. संगीतकार देव यांना राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर तसेच गदिमा यांच्यासह अनेक सन्मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, भातुकलीच्या खेळामधील राजा आणिक राणी, कुठे शोधिती रामेश्वर...' अशी एकापेक्षा एक दर्जेदार रचनांना यशवंत देव यांनी संगीतबध्द केल्याने ही गीते अजरामर ठरली आहेत. त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर,संगीतकार वसंत प्रभू,कवी, गीतकार पी. सावळाराम, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली.
संगीत विश्वात आपल्या कर्तृत्वातून महत्वाचे स्थान निर्माण करणाऱ्या यशवंत देव यांच्या निधनाने संगीत विश्वाची मोठी हानी झाली आहे, असेही श्री. तावडे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
०००
No comments:
Post a Comment