Monday, 1 October 2018

विकासासाठी माहिती अधिकाराचा उपयोग प्रगल्भपणे करावा - दिलीप धारुरकर


                        आयोगात माहिती अधिकार दिन साजरा

        नागपूर,दि. 01 : माहितीचा अधिकार अधिनियम हा लोकशाहातील सामान्य नागरिकांचे महत्व दर्शविणारा कायदा असून त्याचा उपयोग अर्जदार व प्रशासनातील अधिकारी यांनी प्रगल्भपणे केला तर या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होवून विकासासाठी हातभार लागू शकेल, असे प्रतिपादन राज्य माहिती आयुक्त दिलीप ल. धारुरकर यांनी केले. जागतिक माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीकार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव प्रामुख्याने उपस्थित होत्या.
            माहिती अधिकार हे अमोघ शस्त्र आहे. या शस्त्राचा उपयोग समाजातील दु:ख, दैन्य व वेदना दूर करण्यासाठी केला पाहिजे. मात्र वाटमारीसाठी शस्त्र वापरले जाते तसा या कायद्याचा उपयोग करता कामा नये. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हटली जाते ते या कायद्याच्या बाबतीत कृतीने आपण सिद्ध केले पाहिजे, असे आयुक्त दिलीप धारुरकर म्हणाले.
            यावेळी नागपूर खंडपीठ कार्यालयातर्फे डॉ.सुबोध नंदागवळी यांनी आयुक्तांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. श्रीमती योगिता डांगरे यांनी प्रास्ताविकात माहिती अधिकार कायद्याचा इतिहास तथा पार्श्वभुमी विशद केली. कक्ष अधिकारी नंदकुमार राऊत यांनी अपिलार्थी तसेच प्राधिकरणाने समन्वयाने काम करुन कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे आवाहन केले.
            सहायक कक्ष अधिकारी सुरेश टोंगे यांनी प्राधिकरणांकडून अभिलेख जतन करण्यासंदर्भात विशेष काळजी घेण्यात यावी, असे सांगितले. या कार्यक्रमास माहिती अधिकार कार्येकर्ते, अपिलार्थी व विविध प्राधिकरणातर्फे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                        ** * * * **     

No comments:

Post a Comment