मुंबई दि 29 - भारतीय वायूदलाच्या 235 अधिका-यांना स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी देशातून तारकर्ली येथील एमटीडीसी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) च्या आयआयएसडीए (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वॅटिक स्पोर्ट्स) या प्रशिक्षण संस्थेची निवड झाली आहे. ही बाब राज्यासाठी भूषणावह असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय
गुणवत्ता राखणारे सिंधुदूर्ग येथील आयआयएसडीए या प्रशिक्षण संस्थेत वायूदलाच्या
अधिका-यांना स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती
देण्यासाठी आज मंत्रालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी
श्री काळे बोलत होते. यावेळी प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प अधिकारी डॉ.सारंग
कुलकर्णी आदीसह अधिकारी उपस्थित होते.
श्री काळे म्हणाले, आयआयएसडीए
या प्रशिक्षण संस्थेने आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता राखली आहे. प्रशिक्षण
संस्थेची तांत्रिक चाचणी केल्यानंतर
देशभरातील प्रशिक्षण संस्थेपैकी
राज्यातील आयआयएसडीए या प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे. या
संस्थेकडे असलेल्या पायाभूत सुविधा,क्षमता आणि अत्यंत तज्ज्ञ
प्रशिक्षक यामुळे भारतीय वायू दलातर्फे त्यांच्या अधिकाऱ्यांच्या स्कुबा डायव्हिंग
प्रशिक्षणासाठी आयआयएसडीएची निवड करण्यात आली आहे. आपल्या नियमित प्रशिक्षणाचा भाग
म्हणून भारतीय वायू दलातर्फे त्यांच्या अधिकाऱ्यांना नियमितपणे स्कुबा डायव्हिंगचे
प्रशिक्षण देण्यात येते. ३
जानेवारी ते २९ मार्च 2019 या
कालावधी २० तुकड्यांमध्ये २३५ वायुदलाच्या अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात येणार
असल्याची माहितीही श्री काळे यांनी दिली. किनारपट्टी आणि सागरी पर्यटन
हा पर्यटन क्षेत्राचा एक मोठा भाग आहे. महाराष्ट्रातील किनारपट्टीचा भाग हा आशिया
भागातील उत्तम ठिकाण होण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री कुलकर्णी
म्हणाले,
महाराष्ट्रात तारकर्ली हे स्कुबा डायव्हिंगचे केंद्र म्हणून उदयास
येत आहे. किनारी प्रदेशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळाने स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी आयआयएसडीए (इंडियन
इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वॅटिक स्पोर्ट्स) ही संस्था २०१५ साली
तारकर्ली येथे सुरू केली.
०००
No comments:
Post a Comment