Tuesday, 1 January 2019

पशुधनाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी चारा साक्षरता अभियानात सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी



            नागपूर,दि.01 : जिल्ह्यांतील सर्व शेतकरी पशुपालकांनी या अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्या कडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, पशुसंवर्धनच्या उपआयुक्त डॉ. मंजुषा पुंडलीक तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर उपस्थित होते.
            चारा अभियानाअंतर्गत जनजागृतीचे माध्यमातून जनावरांचे चारा व्यवस्थापन संबंधीचे तंत्रज्ञान जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा पशुसंवर्धन विभागाचा मानस असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी चारा साक्षरता अभियानाशी जोडले जातील, असा आशावाद जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केला.
            चारा साक्षरता अभियानाची सुरुवात दि. 1 जानेवारी 2019 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत चारा साक्षरता ज्योत प्रज्वलीत करुन करण्यात आली.
            या अभियाना अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 2 गावांमध्ये पशुपालकांमध्ये जनावरांचे चारा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यास्तव विशेष मोहिमांद्वारे तज्ज्ञ व्यक्तींकडून मुरघास व निकृष्ट चारा सकस करणे यांचे प्रात्यक्षिक, मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन तसेच चाऱ्याचे नियोजन इत्यादी उपक्रम राबविण्यात येतील. सदरील मोहिमांचे उपरोक्त कालावधीत सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांचे द्वारे जिल्हास्तरावर तज्ञांची चमू तयार करण्यात आलेली आहे.
             आपल्याकडील पशुधनापासून नियमित व अधिक उत्पादन मिळण्यासाठी त्यांना उत्कृष्ठ प्रतिचा चारा व संतुलित आहार देणे आवश्यक आहे. त्यासाठी जनावरांचे वर्षभर चारा नियोजन व व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेला चारा प्रक्रिया करुन शास्त्रोक्त पद्धतीने साठवून ठेवल्यास भविष्यात चाराटंचाई उद् भवणार नाही तसेच दुष्काळी परिस्थितीत सुद्धा शेतकऱ्यांकडील जनावरे चाराअभावी बळी पडणार नाहीत व शेतकऱ्यांचे आर्थिक मोठे नुकसान होणार नाही. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पशुसंवर्धन विभागाने चारा साक्षरता अभियानाद्वारे जनजागृती मोहीम हाती घेतली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
         महाराष्ट्र राज्य सध्या नजिकच्या काळात सर्वात जास्त चारा टंचाईस सामोर जात आहे.  महाराष्ट्र राज्यात सन 2018 मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त 108 तालुक्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, काटोल व नरखेड या तीन तालुक्यांचाही समावेश आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या तीन तालुक्यांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर चारापिकांचे बियाणे व खते वाटप ही योजना राबविण्यात आली. त्यास शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला, असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
    दुष्काळी परिस्थितीची दाहकता कमी करण्याच्या हेतूने पशुसंवर्धन विभागामार्फत जलाशय किंवा तलावाखालील गाळपेर जमिनीवर रब्बी व हिवाळी हंगामासाठी वैरण बियाणे लागवडीकरिता नाममात्र दरावर गाळपेर जमिनी उपलब्ध करण्यास्तव जिल्ह्याला 2 हजार हेक्टर लक्ष्य प्राप्त आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागामार्फत नियोजन व लाभार्थी निवड झालेली आहे. तसेच सदर योजनेत गाळपेर जमिनीव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांचेकडे 2 हेक्टर क्षेत्राकरीता चारा पिकांची लागवड करण्यासाठी 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून या करीता तालुक्यातील पशुसंवर्धन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंजुषा पुंडलीक यांनी केले आहे.
            शेतकऱ्यांकडील अमूल्य व उत्पादक पशुधनासाठी उत्कृष्ट प्रकारचा चारा उपलब्ध होणे व वर्षभरासाठी त्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास पशुपालकांच्या आर्थिक उत्पन्नात निश्चितच भर पडेल, या पार्श्वभूमिवर पशुसंवर्धन विभागामार्फत उपलब्ध चाऱ्याचे सुयोग नियोजनाबाबत पशुपालकांमध्ये व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याचे हेतूने संपूर्ण राज्यभर दि. 10 जानेवारी पर्यंत चारा साक्षरता अभियान राबविण्यात येणार आहे.
                                                ** * * * **




No comments:

Post a Comment