वृ.वि.363
मुंबई, दि. 1 : कोणत्याही आपत्तीच्या काळात वित्त आणि मनुष्यहानी कमी करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची असून समाजाचे मनोधैर्य उंचावण्याचे काम माध्यमांनी करावे, असे मत अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले.
पवई येथील आयआयटी मध्ये आयोजित चौथ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेत ‘मीडिया ॲण्ड डिझास्टर मॅनेजमेंट’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. यावेळी या परिसंवादात श्रीलंकेचे नालका गुणवर्धने, नेपाळचे पुन्दामनी दीक्षित आणि केरळच्या एस. गोपीकष्ण वरियर यांनी सहभाग घेतला.
श्री.देऊळगावकर म्हणाले, दरवर्षी भारत, नेपाळ, भूतान, श्रीलंका, इंडोनेशिया आणि बांगलादेशात महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ, भूकंपाच्या घटना घडतात. त्यामध्ये हजारो लोकांचा बळी जातो. अशावेळी आपत्तीची जोखीम कमी करणे महत्वाचे असते. मानव निर्मित अथवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय करायला पाहिजे, याचे प्राथमिक शिक्षण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दिले पाहिजे. यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत कार्यक्रम आखला पाहिजे. यासाठी समाजमाध्यम महत्वाची भूमिका बजावू शकते. आपत्ती निवारण करण्याच्या दृष्टीने जागतिक पातळीवर अभ्यास सुरू आहे. कोणते शिक्षण दिले पाहिजे. यावर विचारमंथन होत आहे. नागरिकांनी माहिती तत्रज्ञांनाचा आधार घेवून भूकंप रोधक घरे बांधण्यावर भर दिला पाहिजे. भविष्यात तापमान वाढीचा धोका आहे, असे सांगून त्यांनी त्याचे परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागू नये म्हणून आतापासूनच उपाय योजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले.
श्री. वरियर म्हणाले, आपत्तीच्या काळात पारंपरिक माध्यमे आणि आधुनिक माध्यमांची भूमिका महत्वाची ठरते. माध्यमांनी अचूक वृत्त देऊन आपत्तीचे जोखीम कसे कमी करता येईल यासाठी शासन आणि समाजासोबत काम केले पाहिजे. केरळमध्ये आलेल्या महापूर प्रसंगी माध्यमांनी आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली असे सांगून ते पुढे म्हणाले, काही वृत्तपत्रांनी आपले प्रतिनिधी आणि छायाचित्रकारांना वेगवेगळ्या भागात पाठवून वृत्तांकन केले होते. पूर हटेपर्यंत सर्वजण तेथेच होते. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाटस्ॲप, फेसबुक, व्टिटरद्वारे जगभर माहिती पोहोचवली, त्यामुळे मदतीचा ओघ येण्यास मदत झाली. अनेक राज्यांनी मदत केली. अनेक सामाजिक संस्थानी हातभार लावून केरळला सावरले.
श्री. गुणवर्धने यांनी आपल्या भाषणातून श्रीलंकेत आलेल्या विविध आपत्तींची चर्चा केली. माध्यमांनी अधिकृत माहिती जनतेसमोर मांडल्यास विश्वार्हता निर्माण होते. माध्यमे देखील समाजाचा भाग आहेत. ते वेगळे होऊ शकत नाही. आपत्तीच्या काळात कुठे कोणती गरज आहे हे नेमकेपणाने दाखविल्यास निश्चित ठिकाणी मदत पोहचते.
हिमालयाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात बर्फाची तळी निर्माण झाली असून अशावेळी या भागात भूकंप झाल्यास भारत, नेपाळ आणि बांग्लादेशांच्या नद्यांना मोठ्या प्रमाणात महापूर येवू शकतो. मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी होऊ शकते, अशी भीती नेपाळचे श्री.दीक्षित यांनी यावेळी व्यक्त केली. माध्यमांविषयी बोलताना ते म्हणाले, आपत्तीच्या काळात माध्यमांनी वास्तव चित्रण करून जनतेला दिलासा द्यावा. कोणतीही दुर्घटना लाईव्ह दाखविताना माध्यमांमध्ये स्पर्धा असू नये. जनतेला सत्य सांगितले पाहिजे. कुठल्याही बातमीमुळे किंवा एखाद्या दृष्यामुळे जनतेत भीती, संभ्रमावस्था निर्माण होणार नाही याची जबाबदारी माध्यमांनी घेतली पाहिजे, असे सांगून त्यांनी दक्षिण आशिया खंडातील तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नवीन समस्येबाबत चर्चा केली.
या परिसंवादानंतर जम्मू काश्मिर, भूतान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, केरळ, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, बांगलादेश, महाराष्ट्र, कर्नाटक,गुजरात आदी देश विदेशातील विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवर तज्ज्ञांसोबत प्रश्न विचारून चर्चा केली. या चर्चासत्राला वृत्तपत्र विद्याशाखेचे विद्यार्थी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment