मंत्रालय उपहारगृहाचे उद्घाटन
मुंबई, दि. 1 : नुतनीकरण केलेल्या मंत्रालय मुख्य इमारतीतील उपहारगृहाचे उद्घाटन सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव डी. के. जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव राजीव निवतकर उपस्थित होते.
आजच्या युगात आदरातिथ्य सेवेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे, असे सांगून श्री. येरावार म्हणाले, मंत्रालयाचे उपहार गृह 1959 पासून मंत्रालयातील 6 ते 7हजार अधिकारी, कर्मचारी
आणि मंत्रालयात कामासाठी राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांना माफक दरात खानपान सेवा
उपलब्ध करुन देत आहे. अत्याधुनिक रचनेनुसार नुतनीकरण केलेल्या उपहारगृहातील
प्रसन्न वातावरणात नाश्ता व भोजनाचा आस्वाद घेणाऱ्यांना आनंद वाटेल. खान-पान सेवा
पुरविताना स्वच्छता, खाद्यापदार्थांचे वैविध्य आणि
पदार्थांची रुचकर चव जपावी, असेही ते म्हणाले.
या उपहारगृहात सुसज्ज व स्वच्छतेच्या
मानकानुसार स्वयंपाकघर (किचन) बनविण्यात आले आहे. स्वयंपाकासाठीचा गॅस
पाईपलाईनद्वारे घेण्यात आला असल्याने आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ गॅसपुरवठा बंद
करता येणार आहे. बसण्यासाठी उत्कृष्ट खुर्च्या व टेबल, महिला,
अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष अशा सोयी करण्यात आल्या आहे. येथील
सर्व कर्मचाऱ्यांना यशदामध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे
खाद्यपदार्थांमध्ये वैविध्य आढळून येईल.
मंत्रालयात उपहारगृहाच्या मुख्य
इमारत व विस्तारीत इमारतीत अशा दोन शाखा आहेत. याशिवाय नवीन प्रशासन भवनमध्येही
दोन शाखा कार्यरत आहेत. 1959 मध्ये उपहारगृहाची सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच
नुतनीकरण करण्यात आले आहे. दि. 26 जुलै 2005 ची अतिवृष्टी, दि. 21 जून
2012 रोजी मंत्रालयाला लागलेली आग तसेच 29 ऑगस्ट 2017 रोजीची अतिवृष्टी अशा
आपत्कालीन परिस्थितीमध्ये मंत्रालयात अधिकारी, कर्मचारी
अडकून पडले होते. अशा आपात्कालीन परिस्थितीत अडकून पडलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना
उपहारगृहाच्या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त कामाच्या ताणाची पर्वा न करता
कर्तव्यभावनेने खान-पान सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
स्वागत व प्रास्ताविक सामान्य
प्रशासन विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी यांनी केले. आभार उपहारगृहाचे
महाव्यवस्थापक तथा अवर सचिव दादासाहेब खताळ यांनी मानले.
कार्यक्रमाला मंत्रालयातील विविध
विभागांचे सहसचिव,
उपसचिव, अवर सचिव आदींसह मंत्रालयीन अधिकारी
कर्मचारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment