मुंबई/लोकसभा निवडणूक/मतमोजणी
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे आयोजन
मुंबई, दि. 16 : लोकसभा निवडणूक-2019 मतमोजणीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आज राज्यातील जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गोरेगाव येथे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आदर्श मतमोजणी केंद्राला निवडणूक आयोगाचे अधिकारी तसेच राज्यातील जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज भेट दिली. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, भारत निवडणूक आयोगाचे संचालक निखील कुमार, व्ही. एन. शुक्ला, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव मधुसूदन गुप्ता आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दि. 23 मे, 2019 रोजी होणार आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी,मतमोजणीची कार्यपद्धती, मतमोजणीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निर्देश आदींबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
मतमोजणीच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर निकाल प्रदर्शित करणे, व्हीव्हीपॅटमधील मतदान चिठ्ठयांची मोजणी याबाबत अभिरुप मतमोजणीचे (मॉक काऊंटिंग) प्रत्यक्ष प्रशिक्षण (हॅण्ड्स ऑन ट्रेनिंग) यावेळी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले. हे अधिकारी नंतर त्यांच्या अधिपत्याखालील मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबतचे प्रशिक्षण देणार आहेत.
००००
No comments:
Post a Comment