नागपूर,दि.14: महाराष्ट्र शासन व श्यामची आई फाऊंडेशन यांच्या
संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी मोबाईलच्या माध्यमातून कल व
अभिक्षमता चाचणी महाकरिअर मित्र ॲपच्या मदतीने सन 2018-19 या सत्रात सर्व
शाळांमध्ये घेतली आहे. तसेच चाचणी अहवाल प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेच्या
माध्यमातून देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक
विकास संस्थेचे प्राचार्य रविंद्र रमतकर यांनी दिली.
नागपूर जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शिक्षण मंडळाची
परीक्षा देणाऱ्या दहावीच्या 60 हजार 172 विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली आहे व
त्यात विद्यार्थ्यांचा विशेष कल, कला क्षेत्रात दिसून आला आहे. प्रत्येक शाळेत व्यवसाय मार्गदर्शन व
मानसशास्त्रीय समुपदेशन कार्यशाळा घेऊन अहवालाच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढील
शिक्षणाचे क्षेत्र व संधी यावर मार्गदर्शन केले जात आहे. तसेच प्रत्येक जिल्हास्तरावर
युआरसी - 2,3,4 व 5 तसेच तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी यांच्या अंतर्गत व्यवसाय
मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन कक्ष
सुरु करण्यात आले आहेत.
महाकरिअर मित्र ॲपच्या मदतीनेही विद्यार्थ्यांना
शिक्षणाच्या पुढील संधीविषयी वाणिज्य, आरोग्य व विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी,
गणवेशधारी सेवा, कला व मानव्यविद्या, ललित कला या क्षेत्राची माहिती प्राप्त करुन घेता येईल. जिल्ह्यातील व तालुक्यातील केंद्राच्या
माध्यमातून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास
संस्थेचे प्राचार्य रविंद्र म. रमतकर, यांनी केले आहे. अधिक माहिती करीता जिल्हा समन्वयक, श्रीमती
नितू गावंडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता (9881018439) व समुपदेशक, विनोद भगणे
(8806000147) यांच्याशी संपर्क साधावा.
****
No comments:
Post a Comment