मुख्यमंत्र्यांनी साधला पुणे जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद
कार्यवाहीसाठी मे महिना फायदेशीर
मुंबई, दि. १३ : सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक बंधारे, तलाव तसेच प्रकल्पातील पाणी खोल गेले आहे. अशा परिस्थितीत कोरड्या पात्रातील गाळ हा'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेअंतर्गत काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. पाऊस सुरु होण्यापूर्वी शक्यतो मे महिन्यातच याबाबतीत गतीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे, सातारा आणि सांगली जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे या जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरुर तालुक्यांमधील साधारण 30 सरपंचांशी त्यांनी चर्चा केली.
पुणे जिल्ह्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब ४८ तासाच्या आत निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. तहसीलदारांनी गावातील २०१८ ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सरपंचांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
दुष्काळाच्या प्रश्नावर थेट सरपंचांशी मोबाईलवर चर्चा करुन समस्या जाणून घेतल्याबद्दल आजच्या संवादादरम्यान अनेक सरपंचांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. दुष्काळ निवारणासाठी सरपंच आणि जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाचा संवाद घडवून आणणारा हा उपक्रम राबविल्याबद्दल बारामती तालुक्यातील सरपंच निलेश केदारी यांनी बारामती सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
गावामध्ये पाणी आहे, पण वाड्या वस्त्यांवर पाणी नाही, असा मुद्दा दौंड तालुक्यातील एका महिला सरपंचांनी मांडला. त्याची दखल घेऊन आवश्यकतेनुसार वाड्या वस्त्यांवरही लोकसंख्येप्रमाणे तातडीने टँकर सुरू करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील एका गावच्या सरपंचांनी रस्त्याच्या कामात पाण्याची टाकी येत असल्याने ती नव्याने बांधून मिळावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेत नव्या जागी पाण्याची टाकी बांधून द्यावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनास केल्या.
बारामती तालुक्यातील सरपंचांनी चारा डेपो सुरु करावेत, अशी मागणी केली. उपसमितीसमोर हा विषय ठेवून व्यवहार्यता तपासून याबाबत नक्की निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केले. बारामतीतील दुसऱ्या एका सरपंचांनी १७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मांडला. स्त्रोतामध्ये फक्त १५ दिवस पुरेल इतका पाणीसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. या गावांच्या पाणीपुरवठ्याची काळजी घेण्याबरोबरच जुनी पाईपलाईन स्वच्छ आणि दुरुस्त करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.
यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पदूम विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना
• आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरुर या 7 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषीत करण्यात आला आहे.
• पुणे जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी 12 तालुक्यांमधील 116 गावे व 988 वाड्या आणि वस्त्यांमध्ये सद्यस्थितीत 196 टँकर सुरु आहेत. त्यापैकी बारामती 37, पुरंदर 26, आंबेगाव 25, दौंड 22, जुन्नर 19, शिरुर 19, इंदापूर 14, हवेली 10, खेड 8, मुळशी 8, भोर 4 आणि वेल्हे 4 असे एकूण 196 टँकर सुरु आहेत.
• पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ पुणे जिल्ह्यात आज अखेर 512 विंधण विहिरीद्वारे, 52 नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करुन, 10 तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करुन व 57 विहिरींचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.
• पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची रु.7.75 कोटी इतकी विद्युत देयकाची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे. व सर्व नळ पाणीपुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरु करण्यात आला आहे.
• पुणे जिल्ह्यात एकूण 3 शासकीय चारा छावण्या उघडण्यात आलेल्या आहेत. त्यात अद्याप जनावरे दाखल नाहीत. सेवाभावी संस्थांच्या 2 छावण्या उघडण्यात आल्या असून त्यामध्ये 135 जनावरे दाखल आहेत.
• पुणे जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 7 तालुक्यातील 837 गावातील 1 लाख 72 हजार 553 शेतकऱ्यांना रु.66 कोटी 43 लाख इतकी रक्कम वाटप केलेली आहे.
• पुणे जिल्ह्यातील एकूण 19 हजार 039 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. सदर हंगामात नुकसान भरपाईपोटी रु. 6 कोटी 46 लाख अदा करण्यात येणार असून त्यापैकी रु.6 कोटी 44 लाख इतकी रक्कम 8 हजार 415 शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.
• प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील 2.55 लाख शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 38 हजार शेतकऱ्यांना 2 हजार रुपये प्रमाणे पहिला हप्त्यापोटी एकूण रु. 7 कोटी 50 लाख इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याचे काम सुरु आहे.
• महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात 728 कामे सुरु असून त्यावर 2 हजार 637 मजूर उपस्थित आहेत. सर्वात जास्त 510 मजूर इंदापूर तालुक्यात असून सर्वात कमी 34 मजूर जुन्नर तालुक्यात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये 7 हजार 945 कामे शेल्फवर आहेत.
००००
No comments:
Post a Comment