सामान्य प्रशासन विभाग
महाराष्ट्रासाठी असलेल्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाऐवजी राज्य निवडणूक विभाग म्हणून स्वतंत्र विभाग निर्माण करण्यास आणि त्यासाठी नवीन 128 पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
भारत निवडणूक आयोगाने 4 मार्च 2014 च्या पत्रान्वये, निवडणुकांच्या काळात व निवडणुका नसतानाच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य कार्यालय आणि त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हा व तालुका स्तरावरील क्षेत्रीय कार्यालये यांच्यासाठी आकृतीबंध निश्चित केला आहे. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व क्षेत्रीय कार्यालयाची संरचना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. निवडणुकीचे कामकाज हे अत्यंत संवेदनशील, महत्वाचे तसेच कालमर्यादेत असल्याने, भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नवीन पदांची निर्मिती करण्याचेदेखील निर्देश दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या या सूचनांनुसार राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील कार्यासन 33 (निवडणूक शाखा) अंतर्गत कार्यान्वित असलेल्या मुख्य निवडणूक अधिकारी, कार्यालयाऐवजी राज्य निवडणूक विभाग निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या आकृतीबंधानुसार निवडणुकांच्या काळात व निवडणुका नसतानाच्या कालावधीत या विभागासाठी 9 कक्ष स्थापन करण्यात येणार असून 128 पदे नव्याने निर्माण करण्यासदेखील मंजुरी देण्यात आली आहे.
-----०-----
No comments:
Post a Comment