Monday, 23 September 2019

विधानसभा निवडणूक - सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



नागपूर, दि.23: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली बचतभवन सभागृह येथे आज आढावा बैठक घेण्यात आली.
नागपूर जिल्ह्यातील आदर्श आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी स्थानिक पोलिस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा, कामाची वेळ याबाबत पुरेशी आगावू सूचना देवून आवश्यक ती परवानगी घ्यावी. प्रस्तावित सभेच्या जागी कोणाचेही निर्बंध किंवा प्रतिबंध आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पूर्णपणे पालन करावे. पक्षाची मिरवणूक काढतांनाही वाहतूकीचे नियम पाळावे.  मिरवणुकीमुळे अडथळा होवू देवू नये.
सत्ताधारी पक्ष, शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात व सर्व जाहिराती काढण्यास प्रतिबंध आहे.  मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करु नये. इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर, आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यस्त  माहिती यांच्या आधारावर टिकाटिपणी करु नये. लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे यांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब करु नये. मिरवणूकीतील लोक क्षेपणास्त्र  किंवा शस्त्र म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जावू शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगू नये. निवडणूकीच्या काळात मद्यवाटप केल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकरी उपस्थित होते.
*******

No comments:

Post a Comment