Friday, 22 November 2019

रामटेक, मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांना धान पिकाचा विमा

               ·             तीन हजार शेतकऱ्यांचा समावेश
              ·            जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कंपनीने दिली माहिती
            नागपूर‍ दि.22 : जिल्ह्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे धान पिकाच्या नुकसानीसाठी रामटेक व मौदा तालुक्यातील तीन हजारावर शेतकऱ्यांना धान पिकाच्या विम्याची रक्कम दिल्याची माहिती विमा कंपनीने जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत दिली.
            जिल्ह्यात अवकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.  शासनाकडून मदतही जाहीर करण्यात आली.  पिकांना हेक्टरी 8 हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत तर फळपिकांना प्रती हेक्टरी 18 हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत मिळणार आहेत. ही मदत तीन टप्प्यात मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 
याबाबत शासनाकडून, यंत्रणेकडून पंचनामे पूर्ण झाले. परंतु, विमा कंपन्यांचे पंचनामे अद्याप सुरु आहेत.  जिल्ह्यात 51 हजार शेतकऱ्यांनी खरीपमध्ये विमा काढला होता.  याबाबत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी विमासंदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.  जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या धान पिकाच्या नुकसानीसाठी 3 हजार 162 शेतकऱ्यांना 3 कोटी 81 लाख 98 हजार 93 रुपयाची विमा रक्कम देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
*****  

No comments:

Post a Comment