* कान्होलीबारा व धापेवाडा येथून पथदर्शी योजनेचा शुभारंभ
नागपूर, दि.
24 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती
योजनेच्या आधार प्रमाणीकरणास हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा व कळमेश्वर
तालुक्यातील धापेवाडा येथून आधार प्रमाणीकरण योजनेचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक अजय
कडू यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्ह्यातील 50 हजार 232 पात्र शेतकऱ्यांची
माहिती संकलित करण्यात आली आहे. प्रायोगिक
तत्त्वावर कान्होलीबारा व धापेवाडा येथील अनुक्रमे 212 व 77 पात्र शेतकऱ्यांची
यादी पोर्टलवर उपलब्ध झाली. ही यादी संबंधित बँक व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध
करण्यात आली आहे. दोन्ही गावातील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम सुरळीतपणे
सुरु आहे. यावेळी हिंगण्याचे
सहाय्यक निबंधक चैतन्य नासरे तर धापेवाडा येथे जिल्हा मध्यवती सहकार बँकेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. नाईक उपस्थित होते.
यावेळी गजानन काशिनाथ सायम, रमेश
कृष्णाजी लाड, हनुमान माणिक बुधवाडे, रामाजी वऱ्हाडे या शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती
योजनेच्या जलद अंमलबजावणीसाठी समाधान व्यक्त केले.
शेतकऱ्यांना
कर्जमुक्ती देण्याच्या दृष्टीने महात्मा जोतिराव
फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु करण्यात आली. या योजनेनुसार 1 एप्रिल 2015 ते
31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्ज
व अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठित कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकी
व परतफेड न केलेली रक्कम दोन लाखांपेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास दोन लाख
मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील लाखो
शेतकऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे ही कर्जमुक्ती देताना शेतकऱ्यांचे कोणत्याही
प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नाही याचाच अर्थ अल्पभूधारकांना
या योजनेचा लाभ मिळणार आहेच शिवाय जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत त्यांनाही या
योजनेचा लाभ मिळणार आहे.
कान्होलीबारा व धापेवाडा येथील 289 पात्र शेतकऱ्यांची यादी
पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणीकरण सुरळितपणे सुरु आहे. या याद्यामध्ये काही
त्रुटी आढळल्यास त्याची त्रुटीपूर्तता केली जाईल, असे जिल्हा उपनिबंधक अजय कडू
यांनी सांगितले.
*******
No comments:
Post a Comment