रस्ते सुरक्षा समितीची बैठक संपन्न
नागपूर, दिनांक 26 : वाढत्या अपघातांची संख्या व भीषणता पाहता अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी रस्ता सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन खासदार तथा जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेसंदर्भात गठीत कामकाज समीतीचे उपाध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी आज केले.
छत्रपती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे रस्ते सुरक्षा समितीची आढावा बैठक श्री. महात्मे याच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
सदस्य सचिव जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे तसेच रस्ता सुरक्षा संदर्भात काम करणा-या सामाजिक संस्थाचे प्रतिनीधी अशोक करंदीकर, चंद्रशेखर मोहिते यावेळी उपस्थित होते.
दरवर्षी देशभरात 5 लाख अपघात होवून यात सरासरी दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. 3 लाख लोक या अपघातात गंभीर जखमी होतात. यामुळे जवळपास 2 टक्के जीडीपीचे नुकसान होते. यामध्ये 18 ते 35 वयोगटातील 62 टक्के तरुण मुलांचे प्रमाण आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळ म्हणजेच ब्लॅक स्पॉटची पाहणी करून जिल्हा रस्ता सुरक्षा समीतीने तात्काळ अहवाल देण्याचे निर्देश श्री. महात्मे यांनी यावेळी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने जास्तीत जास्त सजग राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य पार पाडावे. यात ब्लॅक स्पॉट, खड्डे दुरुस्ती, रस्ते तयार करणे, साईनबोर्ड व माहितीचे बोर्ड तयार करणे, दुभाजकाचे व रंगरंगोटीचे काम करणे, वाहतूक साधनांची दुरुस्ती करणे, झेब्रा क्रॉसिंग, प्रवासी मार्गदर्शक बोर्ड लावणे, रस्ता दुरुस्तीच्या ठिकाणी सावधानतेचा इशारा व उपाययोजना राबविल्यास रस्ते अपघाताचे प्रमाण फारच कमी होईल. वाहतूक पोलिसांनी पार्किंग व्यवस्थेवर काटेकोरपणे लक्ष दिल्यास बरेच अपघात होणे टाळता येईल. महामार्ग पोलीस विभागाने ब्लॅक स्पॉटची पाहणी करून तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजना करव्यात. जिल्ह्यात अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदत करणाऱ्या जीवनरक्षकांची संख्या वाढवावी अशी सूचनाही श्री. महात्मे यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी नागपुरातील रस्ते सुरक्षासंदर्भातील कृतींची सविस्तर माहिती दिली. अपघातांतील जखमींचा जीव वाचविणे व त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिली. तसेच अपघातग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून वाहतूक पोलिसांना प्रथमोचाराचे प्रशिक्षण द्यावे, असेही ते यावेळी म्हणाले.
****
No comments:
Post a Comment