Sunday, 8 March 2020

पशुवैद्यकीय रुग्णालये अद्ययावत ठेवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे - सुनील केदार यांचे आदेश



नागपूर दि. 8 : कृषीपूरक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हाती खेळते भांडवल राहते. असे व्यवसाय नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांना खंबीरपणे उभे राहण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे पशुवैद्यकीय रुग्णालये अद्ययावत ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज दिले. 
            गणेशपेठ येथे झालेल्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या  बैठकीत ते बोलत होते. विभागीय सह आयुक्त डॉ. किशोर कुमरे, उपायुक्त डॉ. मंगेश काळे, डॉ. राजू भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.  
            नागपूर विभागातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे, रुग्णालय इमारत बांधकामाची सद्यस्थिती, भाडेतत्त्वावर असलेल्या एकूण इमारती, पशुवैद्यकीय रुग्णालये आदींचा श्री केदार यांनी आढावा घेतला. भाडेतत्त्वावरील रुग्णालये स्थानांतरीत करुन संबंधित ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला पत्रव्यवहार करुन त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना श्री. केदार यांनी यावेळी दिल्या.  
     वर्धा जिल्ह्यातील वैरण विकास कार्यक्रमाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत, इतर जिल्ह्यांनी असा प्रकल्प राबवावा. राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने  नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असतांना, पशुसंवर्धनासह दुधाळ जनावरे वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना त्याबाबत प्रोत्साहित करण्याबाबत या बैठकीत विभागस्तरीय आढावा घेण्यात आला. विशिष्ट कालमर्यादेत डिफेक्ट लायबॅलिटी क्लॉजनुसार नादुरुस्त पशुवैद्यकीय रुग्णालयांच्या इमारतीची यादी तात्काळ सादर करण्याच्या सूचना देत गडचिरोली‍ जिल्ह्यात फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.
*****

No comments:

Post a Comment