*
सार्वजनिक बांधकाम विभागाचे विशेष नियोजन
*
मेयोमध्ये 172 तर मेडिकलमध्ये 230 खाटांचा अतिदक्षता विभाग
* नागपुरात साकारले दोन
समर्पित कोविड रुग्णालय
नागपूर, दि. 27
: कोरोना
बाधित रुग्णांच्या उपचारासाठी राज्याच्या उपराजधानीत 1 हजार 250 खाटां क्षमतेची
दोन कोविड समर्पित विशेष रुग्णालये सुरु होत आहेत. कोरोनाग्रस्तांना तात्काळ
वैद्यकीय उपचार मिळावा यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील या विशेष रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. सार्वजनिक
बांधकाम विभागाच्या विशेष नियोजनामुळे अत्यावश्यक सुविधा असलेली ही सुसज्ज इमारत
अल्पावधीत उभी झाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव सातत्याने वाढत असल्यामुळे अशा
बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व समर्पित कोविड रुग्णालय तयार करण्यासाठी केंद्र व
राज्य शासनाने केलेल्या सूचनेनुसार मेयो व मेडिकल येथे अस्तित्वात असलेल्या
व्यवस्थेमध्ये बदल करुन अतिदक्षता विभाग, आयसोलेशन वार्ड तसेच ऑक्सिजन असलेली
संपूर्ण व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्रीय सहभागामुळे अल्पावधीत पूर्ण
झाली आहे. राज्यातील पहिले कोविड रुग्णालय जनतेच्या सेवेत दाखल झाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बाधित रुग्णांसाठी
230 खाटांचा अतिदक्षता विभाग व्हेंटीलेटरसह पूर्ण झाला असून 400 खाटांची क्षमता
असलेला आयसोलेशन वार्ड सुद्धा तयार होत आहे. ट्रामा केअरची इमारत कोविड
हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहे. येथील 50 आयसीयू बेड तसेच व्हेंटीलेटरची
सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासोबत 212 एसडीयू बेड्सला ऑक्सिजन व सक्शनची
सुविधा सुद्धा राहणार आहे. ही संपूर्ण इमारत कोविड रुग्णालासाठी सज्ज झाली आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे 172 खाटांचा
अतिदक्षता विभाग व 394 खाटांचा एचडीयू (23 वार्ड) असलेले सर्जिकल कॉम्प्लेक्स
इमारत कोविड रुग्णांसाठी विकसित करण्यात येत आहे. या संपूर्ण रुग्णालयाचे काम
दिनांक 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करुन इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला
हस्तांतरित करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत वेगाने काम पूर्ण
करुन या इमारतीमध्ये 600 बेडचे हॉस्पिटल पंधरा दिवसाच्या कालावधीत कोविड
हॉस्पिटलमध्ये रुपांतरित केले आहे.
कोविड समर्पित रुग्णालयासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
येथे 120 खाटांचा अद्ययावत तीन मजली अतिदक्षता विभागाचे काम सुरु केले असून हा
विभाग सुद्धा 30 एप्रिलपर्यंत हस्तांतरित करण्यात येत आहे. वार्ड क्रमांक 1, 2,
वार्ड क्रमांक 11 ते 16, वार्ड क्रमांक 25 व 26 येथे 330 खाटांची क्षमता विकसित
करण्यात येत आहे. हे काम 10 मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सार्वजनिक
बांधकाम विभागातर्फे 1250 खाटापैकी 262 खाटांचे काम रुग्णालय प्रशासनाला
हस्तांतरित करण्यात आले असून 686 खाटांचे हस्तांतरण 30 एप्रिल रोजी व उर्वरित 330
खाटांची सुविधा 10 मे पर्यंत पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम
विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी दिली.
कोविड समर्पित रुग्णांलयासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा
तसेच विद्युत यंत्रणा निर्माण करण्यासाठी तसेच योग्य मांडणी केल्यानंतर या कामाची
चाचणी घेऊन प्रमाणित करणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता
उल्हास देबडवार व अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
कार्यकारी अभियंता राजकुमार जयसवाल, उपअभियंता डी.डी.रामटेके, प्रमोद वानखेडे,
श्रीमती श्यांभवी चाचेरे, कंत्राटदार अभिजित सपकाळ, मिलिंद सोनी यांनी ही
कार्यवाही पूर्ण केली आहे.
**
* * * **
No comments:
Post a Comment