‘फेसबुक लाईव्ह’च्या
माध्यमातून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे
यांनी दिली नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे
नागपूर, दि. 15 : कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू
असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांचेच नव्हे
तर संपूर्ण राज्याचे आणि देशाचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, नागरिकांचे जीव
वाचविण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच राहावे. सोशल डिस्टंसिंग पाळावे. घरात प्रवेश
केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. इतके जरी केले तरी ‘कोरोना’विरुद्धचे युद्ध नक्की जिंकता
येईल. फक्त हे युद्ध किती दिवसांत जिंकायचे हे नागरिकांच्या हातात असून शासनाचे
निर्देश पाळा. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र
ठाकरे यांनी केले.
कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना
उत्तरे देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी (ता.15) ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून जनतेशी
संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते.
लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढणार काय, 20 एप्रिलनंतर दुकाने सुरु होतील काय, ग्रामीण भागात असलेल्या
एम.आय.डी.सी. मधील उद्योग सुरु होतील का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, लॉकडाऊनची मर्यादा कमी करणे अथवा
वाढविणे हे नागरिकांच्या हातात आहे. लॉकडाऊनचे पालन झाले तर कोरोनाची साखळी तुटेल
आणि रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा बसेल. केंद्र शासनाच्या आज नव्या मार्गदर्शक
सूचना आल्या आहेत. त्यानुसार 19 एप्रिलपर्यंत परिस्थितीचे अवलोकन केले जाईल. परिस्थिती आटोक्यात
असली तर काही गोष्टींमध्ये शिथिलता देता येईल. त्यामुळे याबाबतचा निर्णय हा 20 एप्रिल रोजी असलेल्या
परिस्थितीवर आधारीत राहील.
बाहेरगावी अडकलेल्या
व्यक्तींना आपल्या शहरात जाता येईल का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी
स्वत:ला आहे त्या ठिकाणीच ठेवणे, हे कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे आहे
तेथेच राहा. तेथे काही अडचणी येत असेल तर स्थानिक प्रशासन नक्कीच मदत करेल, असा विश्वास त्यांनी
दिला.
ग्रामीण भागात शिरकाव
होऊ नये यादृष्टीने प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहे. मात्र त्यापेक्षाही चांग़ली
बाब अशी की अनेक गावांच्या सीमा गावकऱ्यांनी स्वत: सील केल्या आहेत. भविष्यात जर
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन
पूर्णपणे सज्ज आहे, असेही ते म्हणाले. नागपूर शहरात ज्या-ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह
आढळले, त्या भागातील सुमारे तीन
किलोमीटर परिघाचा परिसर सील करण्यात आला आहे.
लॉकडाऊनदरम्यान निराधार
ज्येष्ठ नागरिक, गरजू व्यक्ती, दिव्यांगांना त्रास होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासन समाजसेवी
संस्थांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत भोजन, दैनंदिन आवश्यकतेचे सामान
पोहचवित आहेत. दररोज सुमारे 65-70 हजार लोकांपर्यंत मदत पोहचविली जात आहे. रस्त्यावर भटकंती करणारे, बेघर लोकांनासुद्धा
मनपाने उभारलेल्या बेघर निवाऱ्यात ठेवण्यात आले असून तेथे त्यांच्या आरोग्याची
काळजी घेतली जात आहे आणि त्यांनी चहा, नाश्ता, भोजन पुरविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांना ज्या-ज्या
समस्या आहेत,
त्यांचे
प्रश्न आहेत,
त्यांना
मदत हवी आहे,
यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागपूर महानगरपालिका येथे नियंत्रण कक्ष आहे. ते
क्रमांक वेळोवेळी विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविले आहेत. त्या क्रमांकावर
फोन करून नागरिक आपल्या शंकांचे समाधान करू शकतात.
कोरोना हे देशावर आलेले
मोठे संकट आहे. त्याचा सामना सर्वांनी एकत्रित येऊन करायचा आहे. हे पहिले असे
युद्ध आहे ज्यात या देशातील प्रत्येक व्यक्ती योद्धा आहे आणि घरात बसून हे युद्ध
लढायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने योद्धा बनून ही लढाई जिंकायची आहे. तेव्हा सावध
राहा, सुरक्षित राहा, घरी राहा आणि कोरोनावर
विजय मिळवा,
असे आवाहन
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
यावेळी माहिती संचालक
हेमराज बागुल, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजानजी, जिल्हा माहिती अधिकारी
अनिल गडेकर, रवि गिते, मेट्रोचे अखिलेश हळवे, आनंद नगरकर, आनंद अंबेकर, बरखा गोयनका
आदी उपस्थित
होते.
**
* * * **
No comments:
Post a Comment