नागपूर, दि.21 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लॉक डाऊन’ 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. यादरम्यान काही उद्योग आस्थापना सुरु करण्यासाठी शासनाने सुट दिली आहे. या पार्श्वभूमिवर नागपूर शहर तथा विभागातील कायदा व सुव्यवस्था चोख ठेवावी, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस विभागाला दिले. कोणीही अनावश्यक फिरणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, त्याचप्रमाणे भाजीपाला व अन्नधान्य घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवावी, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिग पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वीज विभागाच्या विश्रामगृहात आज कायदा व सुव्यवस्थेचा आढावा गृहमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, सहआयुक्त रविंद्र कदम, अप्पर पोलीस आयुक्त निलेश भरणे, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला व सर्व परिमंडळाचे पोलीस उपायुक्त यावेळी उपस्थित होते. या बैठकीत परिमंडळनिहाय कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
नागपूर पोलीस विभागाने कोविड योध्दा हा उपक्रम सुरु केला असून यामध्ये 700 तरुण स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून नागरिकात कोरोना विषयी जनजागृती करण्यात येत आहे. शहरात 65 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून विनापरवानगी एकही वाहन रस्त्यावर फिरत नाही. सतरंजीपुरा, बैरागीपुरा, मोमिनपुरा, शांतीनगर पूर्णपणे सील केले असून गिट्टीखदान व कामठीमधील काही भागाचा यात समावेश आहे. कोविड योध्दा यांची 33 पोलीस ठाणे अंतर्गत नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून बंदोबस्तासाठी सहकार्य होत आहे, अशी माहिती भूषण कुमार उपाध्याय यांनी दिली. शहरात वाहनांची तपासणी कडक करण्यात आली असून आतापर्यंत 797 वाहने जप्त करण्यात आली आहे. लॉक डाऊन संपल्यानंतरच ही वाहने परत करण्यात येतील.
शहरातील नागरिकांना प्रशासनामार्फत जीवनावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. शहरातील 335 झोपडपट्टी क्षेत्रात सामाजिक संघटनाच्या माध्यमातून अन्नदान, धान्यवाटप व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते. या वाटपाचा समन्वय पोलीस विभाग करत आहेत. दरदिवशी जवळपास 95 ते एक लाख लोकांपर्यंत शिजवलेल्या अन्नासह विविध साहित्याचे वाटप होत आहेत, असेही त्यांनी सांगितले. विस्थापित तथा मजुरांसाठी निवारागृहाची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी 1500 च्या वर नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दोनवेळेचे जेवण, नाश्ता, राहण्याची व्यवस्था, योगा वर्ग, मनोरंजन, लहान मुलांना खेळणे, टेलिव्हिजन, वैद्यकीय तपासणी व समुपदेशन या सुविधा प्रशासन नियमित पुरवित आहे.
सील करण्यात आलेल्या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित करण्यात यावा. या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, कोणीही उपाशी राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना ही गृहमंत्र्यांनी दिल्या. बाजार व गर्दीच्या ठिकाणचे ड्रोनव्दारे चित्रीकरण करावे असे त्यांनी सांगितले. परिमंडळ तीन मध्ये सतरंतीपुरा, मोमिनपुरा व शांतीनगर हा भाग येत असून या ठिकाणी जास्त खबरदारी घेण्यात यावी, असे ते म्हणाले. पोलीसांना संसर्ग होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात यावी. कर्तव्यावर असणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांना मास्क पुरविण्यात यावे. पोलीस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करावे असेही त्यांनी सांगितले.
एकटे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना औषध व जीवनावश्यक वस्तू घरी पुरविण्यासाठी पोलीसांनी सहकार्य करावे असे सांगून देशमुख म्हणाले की,कोरोना साथीच्या या कठीण काळात पोलीस विभागाने देशभरात उत्तम काम केले असून यामुळे नागरिकांमध्ये सहानुभुती निर्माण झाली आहे. नागपूर पोलीसांनी अतिशय उत्तम काम केले आहे. येणारा काळ थोडा कठीण असणार आहे. कर्तव्यासोबतच सेवा कार्य करुन पोलिसांनी लौकिक प्राप्त केला अशी शाबासकी गृहमंत्र्यांनी दिली.
नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा व नागपूर ग्रामीणचा आढावा सुध्दा यावेळी घेण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी यावेळी कायदा व सुव्यवस्था व सीमा बंद बाबत माहिती दिली. नागरिकांना आवश्यक कामांसाठी ऑनलाईन ई-पास देण्यात येत असल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारीसाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. त्यासुचनांचे सर्व मुस्लिम बांधवांना पालन करावे असे ते म्हणाले.
|
निवारागृहास भेट
अग्रसेन भवन, रवी नगर व तुली पब्लिक स्कुल बोखारा येथील निवारागृहास भेट देवून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तेथील नागरिकांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. अग्रसेन भवन येथील उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाना व मध्य प्रदेश येथील कामगार व विस्थापीत नागरिकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य असून राहणे, जेवण, मनोरंजन, वैद्यकीय तपासणी व समुपदेशनाची उत्तम व्यवस्था असल्याचे निवारागृहातील नागरिकांनी यावेळी सांगितले. लॉक डाऊन संपेपर्यंत निवारागृहातच थांबा, प्रशासन तुमची व्यवस्थेसह काळजी घेईल. असा धीर गृहमत्र्यांनी त्यांना दिला. तुली पब्लिक स्कुल मधील नागरिकांनी सुध्दा पोलीस व प्रशासन उत्तम काळजी घेत असल्याचे यावेळी सांगितले.
*******
No comments:
Post a Comment