नागपूर, दि. 15 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयामार्फत इंडस्ट्री अप्रेंटीसशिप अंमलबजावणी करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित इंडस्ट्री क्लस्टर्स तसेच असोसिएशनने आपले अर्ज 30 जुलैपर्यंत ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक पी.टी. देवतळे यांनी केले आहे.
जागतिक बँकेच्या ‘ स्ट्राईव्ह’(STRIVE) प्रकल्पां तर्गत इंडस्ट्री क्लस्टर्सच्या माध्यमातून शिकावू उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी इंडस्ट्री क्लस्टर्स तसेच असोसिएशनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयामार्फत औद्योगिक विकासावर भर देवून शिकावू उमेदवारांच्या कौशल्यांचे बळकटीकरण करण्यासाठी केंद्र शासन आणि जागतिक बँक संयुक्तपणे अर्थसाह्य प्रकल्प राबवित आहेत. औपचारिक अप्रेंटिसशिप सिस्टीममध्ये भाग घेवून सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग सक्षम करणे हा त्यातील एक उपक्रम आहे. प्रत्येक इंडस्ट्री क्लस्टरसाठी जास्तीत जास्त 1 कोटी निधी प्राप्त होणार आहे.
प्रकल्प कालावधीदरम्यान प्रकल्प राबविण्यासाठी सर्व पात्र आणि इच्छुक इंडस्ट्री क्लस्टर्स तसेच असोशिएशनने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. अर्जाचा नमुना प्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल . https//dgt.gov.in या संकेत स्थळावर अर्जाचा नमुना तसेच इतर अनुषंगिक बाबी, अर्ज कसा करावा, याबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. परिपूर्ण अर्ज Striveclusters@gmail.com या मेलवर पाठवावा. याबाबत अधिक माहितीसाठी सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, सिव्हिल लाइन्स, नागपूर कार्यालयाच्या jtdir. nagpur@dvet.gov.in या ईमेल पत्त्यावर तसेच दूरध्वनी क्रमांक 0712 -2565555 किंवा 2560823 येथे संपर्क साधावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
*****
No comments:
Post a Comment