Monday, 20 July 2020

इंटीग्रेटेड, स्क्रिनिंग आणि स्वॅब कलेक्टिंग ‘कोविड व्हॅन’ आता नागपूरकरांच्या सेवेत






पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले 
 यांच्या हस्ते कोविड व्हॅनचे  लोकार्पण

       नागपूर, दि.20 : कोरोनाचे संकट ओळखून अत्याधुनिक दर्जाची इंटीग्रेटेड स्क्रिनींग आणि सॅम्पल कलेक्टिंग कोविड व्हॅनप्रभाताई ओझा स्मृती सेवा संस्थेने नागपूरकरांच्या सेवेसाठी दिली आहे. या कोविड व्हॅनचे लोकार्पण  पालकमंत्री डॉ. नितीन राऊत तसेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आज करण्यात आले.
            येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रागणात श्री. राऊत तसेच श्री. पटोले यांच्या  हस्ते या व्हॅनची फीत कापून लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर ही व्हॅन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. प्रभाताई ओझा स्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष रामकिशन ओझा, कोविड व्हॅनची निर्मिती करणारे डॉ. समीर अर्बट, प्रकल्प प्रमुख पंकज शहा, सचिव डॉ. मनोहर मुद्येश्व यावेळी उपस्थित होते.
ओझा ट्रस्ट नेहमी सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्यक्रम घेतात. त्याचाच एक भाग म्हणून ही अत्याधुनिक व सुसज्ज कोविड व्हॅन त्यांनी  नागपूरकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. संशयित कोरोना रुग्ण शोधून त्यांची चाचणी घेण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे. यावेळी  श्री. डॉ. राऊत यांनी  श्री. ओझा यांचे सामाजिक कार्यासाठी अभिनंदन केले.
कोविड व्हॅनची माहिती देतांना डॉ. अर्बट म्हणाले, इंटीग्रेटेड स्क्रिनींग आणि सॅम्पल कलेक्टिंग कोविड व्हॅनमध्ये पॉझिटिव्ह प्रेशर बॉक्स बसविण्यात आला आहे. ज्यामुळे आतील हवा बाहेर येईल परंत बाहेरील हवा आत येणार नाही. या व्हॅनमध्ये वातानुकूलित यंत्रणा  हेपाफिल्टरसह बसविण्यात आली आहे.  अशी यंत्रणा शस्त्रक्रियागृहात वापरण्यात येते. शिवाय ही व्हॅन रुंदीला कमी असल्यामुळे तपासणीसाठी  ने-आण करण्यासाठी सुलभ आहे.  व्हॅनमध्ये दोन डॉक्टर्स पीपीई कीट परिधान करूनच स्वॅब तपासणीचे नमुने घेतील. बरेचदा नागरिक कोरोनाची लक्षणे आढळली तरी तपासणीला जाणे टाळतात. यामुळे संसर्गाचा धोका अधिक बळावतो.  अशा वेळी  या व्हॅनच्या माध्यमातून घरपोच संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने गोळा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्रासाठी ही व्हॅन अत्यंत उपयुक्त ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                             ****


No comments:

Post a Comment