नागपूर, दि. 15 : नागपूर जिल्हयातील कर्ज वाटपाच्या लक्षांकाची पूर्ण पूर्तता करण्यात यावी, असे प्रतिपादन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या
सभाकक्षामध्ये सहकार विभागातील अधिकाऱ्यांची कर्ज वाटपाच्या सद्यस्थितीबाबत डॉ.कदम
यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेतली,
त्यावेळी ते बोलत होते. विभागीय सहनिबंधक संजय कदम तसेच नागपूर, वर्धा,
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्हयांचे जिल्हा उपनिबंधक, कापूस पणन
महासंघाचे अधिकारी, जिल्हा पणन अधिकारी उपस्थित होते.
डॉ.कदम यांनी विभागातील सर्व जिल्हयातील
कर्ज वाटपाचा यावेळी आढावा घेतला. ते म्हणाले, महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी
कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जमुक्त झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना नव्याने कर्ज
वाटप होईल. नागपूर विभागातील सर्व राष्ट्रीयकृत बॅकांनीही पीक कर्ज वाटपाच्या
लक्षांकाप्रमाणे मुदतीत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे. शासकीय कापूस
खरेदी व शेतकऱ्यांची रक्कम चुकती करण्याबाबत कापूस पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांनी
शेतकऱ्यांचे राहिलेले चुकारे लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा,
अशा सूचना यावेळी दिल्यात.
नागपूर विभागातील कर्ज वाटप व
कर्जमाफीच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच विभागातील अडीअडचणी
समजावून घेऊन त्याबाबत पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांना निर्देश दिले.
****
No comments:
Post a Comment