‘सतर्क भारत समृध्द भारत’ अंतर्गत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह
नागपूर, दि.26 : भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्यासाठी ‘सतर्क भारत-समृध्द भारत’ ही संकल्पना घेवून जिल्ह्यात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांनी दिली.
केन्द्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय, प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फत सप्ताहाचे आयोजन कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्याने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकान्वये सामाजिक अंतर, मास्क वापरणे इत्यादी अटीचे पालन करून कार्यक्रम पार करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था स्वायत्त संस्थामार्फत २७ ऑक्टोबर रोजी ११ वाजता सर्व शासकीय कार्यालयामध्ये भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेण्यात येणार आहे. शपथ घेतल्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्री महोदयांनी सप्ताहनिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येईल.
भ्रष्टाचाराविरुध्दच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनजागृती, नागरिकांना लाचेच्या तक्रारी देण्याविषयी आवाहन करणे, भ्रष्टाचाराविरूध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपध्दती विषयीची माहिती पत्रकांचे वाटप करणे, जिल्हयातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर, त्याचप्रमाणे मोक्याच्या विविध दर्शनी भागामध्ये स्टिकर व बॅनर्स लावले जाणार आहेत. याबरोबरच स्वयंसेवी संस्था, अशासकीय संघटना, नागरिकांना दक्षता जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
*******
No comments:
Post a Comment