Friday, 29 January 2021
Wednesday, 27 January 2021
कोरोना निर्मुलनासाठी केलेल्या यशस्वी कार्याबद्दल विभागीय आयुक्तांचा गौरव
नागपूर, दि. 27 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागात राबविलेल्या प्रभावी व परिणामकारक उपाययोजनांमुळे विभागात 95.22 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर राहिला आहे. याच काळात जनतेने आवश्यक सोयी व सुविधा उपलब्ध करुन देताना लसीकरणामध्ये सुद्धा विभागाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भारतीय प्रजासत्ता दिनाच्या मुख्य समारंभात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त यांचा स्मृतिचिन्ह देवून विशेष गौरव केला आहे.
नागपूर
विभागात कोरोना प्रादुर्भावाचे 2 लाख 3 हजार 112 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 1
लाख 93 हजार 403 रुग्ण रोगमुक्त झाले आहेत. विभागातील विविध रुग्णालयात 1 हजार 176
रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोविड
रुग्णांची संख्या वाढत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रुगणालयात ऑक्सिजनसह
विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे विदर्भातील रुग्णांसाठी कोविड रुग्णालयात
सुविधा उपलब्ध होवू शकल्या त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले. नागपूर
विभागाचा बरे होण्याचा दर राज्यापेक्षा जास्त आहे. तसेच विभागात 15 लाख 29 हजार
363 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यासाठी नागपूर शहर सर्व जिल्ह्यांमध्ये
विशेष सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. विमानतळावर देशातून व विदेशातून येणाऱ्या
प्रत्येक प्रवाशांची तपासणी करण्याची सुविधा प्रथमत: नागपूर येथे सुरु झाली.
त्यामुळे कोविडवर प्रभावी व परिणामकारक उपचार शक्य झाले. डॉ. संजीव कुमार
यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
विशेष टास्क फोर्स तयार करुन कोरोना रुग्णांवर उपचारासाठी विशेष सुविधा निर्माण
केली. त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
जलसंपदा मंत्री
जयंत पाटील पूर्व
विदर्भ दौ-यावर
नागपूर, दि.27: जलसंपदा व
लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे आज बुधवारपासून पूर्व विदर्भ दौ-यावर येत
असून, ते येथील सिंचन
विभागाचा आढावा घेणार आहेत.
आज बुधवारी, रात्री सव्वादहा वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते रवी भवन या शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील व मुक्कामी राहतील. उद्या गुरुवारी (दिनांक-28) सकाळी साडेनऊ वाजता ते हेलिकॉप्टरने अहेरी (जिल्हा गडचिरोली)कडे प्रयाण करतील.
*****
ऑफिसर्स क्लब येथे ध्वजवंदन
नागपूर दि.27 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सिव्हिल लाईन येथील ऑफिसर्स क्लब येथे ध्वजवंदन कार्यक्रम झाला. विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार अरविंद शेलोकर यांनी ध्वजवंदन केले. ध्वजवंदनानंतर त्यांनी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी निवृत्त सनदी अधिकारी प्रदीप काळभोर, सेवानिवृत्त वन अधिकारी श्री. रमेश सुखदेवे, श्री. राजेंद्रसिंग भंगू, ऑफिसर्स क्लबचे व्यवस्थापक प्रकाश रंगारी, प्रदीप कोटेवार, अनिल पांडे, रवींद्र लिमसे, मोहिंदर कौर मलिक व आलोक पचधारे यांची उपस्थिती होती.
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते वराडा आरोग्य उपकेंद्रांचे भूमिपूजन
आमडी आरोग्य उपकेंद्राचे
लोकार्पण
नागपूर, दि. 27: नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक
आरोग्य केंद्र साटक येथील वराडा उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पशुसंवर्धन,
दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. तसेच आमडी उपकेंद्राचे लोकार्पणही यावेळी करण्यात
आले.
आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षा रश्मी बर्वे, सभापती मनोहर
कुंभारे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी कमल किशोर फुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आदी यावेळी
उपस्थित होते.
ग्रामस्थांना गावातच वेळेवर वैद्यकीय उपचार
मिळावे यासाठी प्रत्येक उपकेंद्राला सर्व सुविधायुक्त इमारत, वैद्यकीय सुविधा
उपलब्ध करुन दिल्या जातील. ग्रामीण भागामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी रुजविण्यासाठी
आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.
पारशिवनी पंचायत समितीच्या सभापती मीना
कावडे, रामटेक पंचायत समितीच्या सभापती कलावती ठाकरे, आमडीच्या सरपंच शुभांगी
भोसकर, वराडाच्या सरपंच विद्या चिखले तसेच आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, गावकरी
यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुधाकर जुनघरे तर आभार
राजू भोसकर यांनी मानले.
बर्ड फ्ल्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी समिती
-
रवींद्र ठाकरे
नागपूर, दि.
27:
जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूच्या संसर्गावर प्रतिबंधात्मक
उपाययोजना प्रभावी व परिणामकारकपणे राबविण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या
अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग टाळण्यासाठी
ही समिती कार्य करणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे
अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात
बर्ड फ्ल्यूने कोंबड्या दगावल्याने या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये
यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे उपविभागीय महसूल अधिकारी
यांच्या नियंत्रणात संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य
अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, पशुधन विकास अधिकारी, वनपरीक्षेत्र अधिकारी,
उप अधीक्षक भूमी अभिलेख आणि पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचा समितीमध्ये सदस्य
म्हणून समावेश राहणार आहे.
प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध
व नियंत्रण अधिनियम 2009 आणि संसर्गांचा प्रतिबंध, नियंत्रण आणि एव्हीयन इन्फ्लूएन्झापासून बचाव, नियंत्रण व प्रतिबंधासाठी कृती योजना तसेच महाराष्ट्र
शासन कृषी व पदुम विभागाच्या अधिसूचनेनुसार
समिती गठीत करण्यात आली आहे.
बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाचा प्रसार होणार नाही यासाठी
आवश्यक ती सर्व दक्षता घेणे, समितीच्या कामकाजामध्ये समन्वय, बाधित क्षेत्रात पंचनामा
करुन कामाकाजाचे सनियंत्रण करणे, आवश्यक साहित्याचा साठा करणे, मृत वा बाधित पक्ष्यांची
खाद्य, अंडी व कुक्कुटगृहातील बाधित वस्तूंची विल्हेवाट लावण्याची जागा उपलब्ध करुन
देणे, संपूर्ण क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करणे, मृत वा इतर नमुने पुणे येथे पोहोचविण्यासाठी
विशेष वाहनाची व्यवस्था करणे हे या समितीचे कामकाज राहणार आहे.
प्रभावित पोल्ट्री फार्म परिसरातील नागरिकांच्या हालचाली तसेच इतर पक्षी
व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करणे, बाधित पक्ष्यांची विल्हेवाट लावताना नागरिकांची
गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे, पक्षी वा खाद्यान्नाची वाहतूक आणि चिकन शॉप बंद
ठेवणे, जलद कृती संघातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करणे, पीपीई किटचा पुरवठा करणे
तसेच योग्य ती ॲन्टीव्हायरल औषधे उपलब्ध करुन देणे, मृत पक्ष्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने
विल्हेवाट लावण्यासाठी जेसीबी व सक्शन मशीन, फॉगर मशीन स्प्रे मशीन साहित्य उपलब्ध
करुन देण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.
Tuesday, 26 January 2021
गोरेवाडा येथे 'गोंडवाना थीम पार्क' उभारणार
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नागपुरात घोषणा
· बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन
· विदर्भाचा मागासलेपणा गोसीखुर्दच्या पाण्याने धुऊन काढणार
नागपूर, दि.26 : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका. आमच्या धमण्यात विदर्भाप्रती प्रेम आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या माध्यमातून जागतिक पर्यटकांपुढे स्थानिक संस्कृती मांडायची आहे. गोंडसमुहाची संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला जगापुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी या उद्यानामध्ये 'गोंडवाना थीम पार्क' उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.
महाराष्ट्र वन विकास महामंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने व भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या लोकार्पणाप्रसंगी बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले. तसेच या उद्यानातील जंबू अस्वलाच्या प्रतिकाचे अनावरण केल्यानंतर उद्यानाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान राजकुमार वाघाने, बिबट तसेच अस्वलाच्या पिल्लांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले.
त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मीताई बर्वे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री विकास ठाकरे, अभिजित वंजारी, दुष्यंत चतुर्वेदी, ॲड. आशिष जायस्वाल, नरेंद्र भोंडेकर, नितीन देशमुख, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., राज्याचे प्रधान वन मुख्य संरक्षक डॉ. एन. रामाबाबू, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर, मुख्य महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, तसेच लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भाच्या विकासाबद्दल सरकार कटिबद्ध आहे. विदर्भात महिन्याभरात चार दौरे झाले आहे. वन, जंगल या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत. देशात आतापर्यंत नसेल अशा प्रकारचे सिंगापूरमधील प्राणिसंग्रहालयाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय उद्यान येथे तयार होईल. गोंडसमूह संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला या उद्यानात समर्पकपणे मांडण्यात येईल. नागपूरमध्ये लवकरच सिंगापूर सारखी 'नाईट सफारी 'सुरू होईल. त्यासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल.
गोसीखुर्द प्रकल्प विदर्भासाठी वरदान आहे. गोसीखुर्दच्या पाण्याने विदर्भाचे मागासलेपण धुऊन काढायचे आहे. त्याआधी एक मे पर्यंत समृद्धी महामार्ग शिर्डी पर्यंत धावायला लागेल. लवकरच सुरजगड प्रकल्प पूर्ण करणार आहे. विदर्भाचा विकास सुरु राहील. एकसंघ विकास काय असतो हे आघाडी सरकार दाखवून देईल.
सफारी दरम्यान त्यांना 'गोरेवाडाचा राजकुमार' संबोधल्या गेलेल्या डौलदार वाघाचे दर्शन झाले. त्याचा उल्लेख करून ते म्हणाले, माणसाचा स्वभाव वाघासारखा विशाल असावा. विदर्भाच्या विकासाबाबत असाच विशाल दृष्टिकोन आपला आहे. ते म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या व्यस्थतेत केवळ संजय यांच्या हट्टापायी आज उद्घाटनाला आलो. मात्र हा प्रकल्प सुंदर असून तो निश्चित पूर्णत्वास जाईल. श्री. राठोड यांनी या प्रकल्पासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.
डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी पर्यटन हे विदर्भाचे 'ग्रोथ इंजिन' असल्याचे स्पष्ट केले. प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समर्पक असून ठाकरे कुटुंबियांनी आपल्या आजोळ असणाऱ्या विदर्भाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे. विदर्भात वनपर्यटन वन्यजीव पर्यटन सोबतच खान पर्यटनाला प्रचंड संधी आहे. नागपूर, यवतमाळ,चंद्रपूर या ठिकाणी असणाऱ्या खाणीमध्ये हे पर्यटन सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटकांना नवे आकर्षण निर्माण होईल. नागपुरातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास जावा. गोरेवाडा येथील दोन्ही प्रकल्प जोडण्यासाठी 'ओव्हरब्रीज ' करण्यात यावा. समृद्धीच्या मार्गाने विदर्भाचा विकास व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्री. आदित्य ठाकरे यांनी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दहा संरक्षित अभयारण्य जाहीर करण्यात आले आहे. नागपूर सभोवताल असलेल्या व्याघ्र प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणात पर्यटक आकर्षित होत आहे. त्यामुळे नागपूर ही खऱ्या अर्थाने देशाची वन राजधानी असून त्यादृष्टीने येथील प्रकल्पाला चालना देण्यात येत आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान निर्मितीसाठी वन विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक करताना विकास, वन आणि पर्यावरण यांची सांगळ घालून साकारलेला हा देशातील एकमेव प्रकल्प असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, वाघाचे संवर्धन करण्यासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी व्याघ्र प्रकल्प ही संकलपना राबविण्यात सुरुवात केली. विदर्भातील सात प्रकल्पामुळे वाघाच्या संख्येतही सातत्याने वाढत होत आहे. त्यामुळेच नागपूरला ‘टायगर कॅपीटल’ म्हूणन नवी ओळख मिळाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवताल राहणाऱ्या आदिवासींना वनीकरणाच्या कामांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे वन विभागाने आदिवासींना वनीकरणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशी सूचना यावेळी केली.
श्री. सुनील केदार म्हणाले, नागपूर शहराच्या तसेच विदर्भाच्या विकासाला गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या माध्यमातून रोजगाराच्या तसेच पर्यटनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीनेही नागपूरकरांसाठी शहराचे हृदय असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सर्वात मोठे वन्यप्राण्यावरील उपचारासाठी गोरेवाडा येथे केंद्र सुरु झाले असून या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे अशी विनंती यावेळी त्यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात वन मंत्री राठोड म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान प्रकल्पाच्या निर्मितीसाठी 450 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनाने शंभर कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यामुळे पहिल्या टप्प्यातील इंडियन सफारीचे उद्घाटन होत आहे.उर्वरित निधी तातडीने मिळाल्यास हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान या प्रकल्पाच्या नामकरणासंदर्भात आदिवासी समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. आदिवासी संस्कृतीचे संवर्धन व जतन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथे सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन येथे येणाऱ्या पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गोंडवाना थीम पार्क हा प्रकल्पा प्राध्यांनाने पूर्ण करण्यास मंजूरी द्यावी, असे यावेळी श्री. राठोड यांनी सांगितले.
वन विभागाचे प्रधान सचिव मलिंद म्हैसकर म्हणाले मानव आणि वन्यप्राणी यातील संघर्ष कमी करण्यास आम्ही प्राधान्य दिले असून वन व पर्यावरणाचे विकासासाठी घेतलेल्या निर्णयामुळे गोरेवाडासारखा महत्त्वकांक्षी प्रकल्पाला चालना मिळाली आहे. शासनाच्या या धोरणामुळे वन विभागाला नवी ओळख मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचलन श्रीमती श्वेता शेलगावकर तर मुख्य महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन यांनी आभार मानले.
मुख्यमंत्र्यांचे चार
दौरे, चार आशय
. . . अन एक सूत्र
बांधिलकीचे !
राज्याच्या उपराजधानीत आज साजरा झालेला देशाचा प्रजासत्ताक दिन एक अनोखा ऋणानुबंध दृढ करणारा होता. त्यासाठी निमित्त ठरले ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या नागपूर भेटीचे. मुख्यमंत्र्यांचा गेल्या काही दिवसातला हा विदर्भातील चौथा दौरा. या चारही दौऱ्यांमागचा उद्देश वेगवेगळा असला तरीही त्यामागचे सूत्र एकच होते, ते म्हणजे विदर्भाशी विविध पातळ्यांवर असलेली एक अतूट आणि परिपूर्ण बांधिलकी अधिक दृढ करण्याचे!
कोरोनाचे सावट ओसरु लागत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध आघाड्यांवरील कामांना गती दिली आहे. या साथीमुळे राज्याच्या विकासाला कोणतीही खीळ बसू नये, यासाठी त्यांची सातत्याने धडपड राहिली आहे. राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या आणि मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असणाऱ्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचा त्यांचा निर्धार कृतीच्या पातळीवर उतरत आहे. यासोबतच विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या राज्यातील भागांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विदर्भाने गेल्या काही दिवसांत त्याची प्रत्यक्ष प्रचिती घेतली आहे.
या विकासकामांच्या आढाव्याचा प्रारंभ त्यांनी गेल्याच महिन्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामास प्रत्यक्ष भेट देऊन केला. त्यासाठी त्यांनी अमरावती जिल्ह्याचा दौरा केला होता. अत्यंत काटेकोरपणे त्यांनी महामार्गाशी संबंधित सर्व कामांची पाहणी करुन येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत शिर्डीपर्यंतचा टप्पा कार्यान्वित करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि त्यानुषंगाने संबंधित यंत्रणेला गतीने कार्यवाही करण्याचे आदेशही दिले.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र विधिमंडळाच्या कायमस्वरुपी कक्षाचे ऑनलाईन उद्घाटन करताना विदर्भ आपल्या हृदयात असून, या माध्यमातून हा अनुबंध अधिक घट्ट करण्याचे वचन दिले होते. हे वचन अवघ्या महिन्याभरात कृतीत आणताना त्यांनी त्यानंतर तीन दौरे केलेत. विदर्भ विकासाचे खऱ्या अर्थाने सिंचन करु शकणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पास त्यांनी भेट दिली. हा महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प सर्व घटकांच्या सहकार्याने येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच प्रकल्प पूर्ण करतानाच त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच ते पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. या दौऱ्यात त्यांनी गोसेखुर्द जलाशयात येणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांची अतिशय आस्थेने माहिती घेतली. त्यांची ही कृती पर्यावरणाप्रती संवेदनशीलता दाखविणारी ठरली. विकासासोबतच पर्यावरणविषयक घटकांचेही संवर्धन करण्याची भूमिकाच जणू त्यांनी त्यातून दाखवून दिली.
विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात केली असतानाच भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेमुळे व्यथित झालेले मुख्यमंत्री त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तातडीने भंडारा येथे दाखल झाले. भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत येऊन त्यांनी दोन्ही शोकाकूल मातांची भेट घेतली. त्यांची वेदना ऐकून ते काही क्षण निःशब्द झाले. त्यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या कुटुंबांची सर्वतोपरी काळजी घ्यावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. या दुर्घटनेमुळे बालकांच्या कुटुंबांची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही, याची मला जाणीव आहे. स्वतःचं मूल अशा पद्धतीने जाणं हे अत्यंत हृदयद्रावक आहे, अशा शब्दात सहवेदना व्यक्त करतानाच यापुढे अशी घटना घडणार नाही असे वचनच जणू मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मातांना दिले. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली ही विनम्र सह्रदयता पाहून दोघींचे कुटुंबीय सद्गदित झाले.
आज मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात विदर्भाशी आपले रक्ताचे नाते असल्याची भावनिक ग्वाही दिली. विकासाचा निर्धार, पर्यावरणाचे संवर्धन, भावनिक एकरुपता आणि सर्वसामान्यांप्रती संवेदनशीलता अशा विविध स्वरुपाच्या आशयातून साकारलेले मुख्यमंत्र्यांचे हे चारही दौरे विदर्भासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहेत. यातून विदर्भाशी असलेल्या अतूट बांधिलकीच्या सूत्राला मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा आवर्जून उजाळा दिला.
*****
शासनाच्या विविध शब्दकोशांमुळे मराठीचा भाषा व्यवहार समृध्द
-
माहिती संचालक हेमराज बागुल
नागपूर, दि.26 : राजभाषा मराठीचा प्रसार आणि प्रचारासोबत भाषा संचालनालयाने अभ्यासकांसाठी शास्त्रीय व तांत्रिक त्रिभाषाकोश तयार करुन विद्यार्थी, अभ्यासक व अमराठी भाषकांसाठी नवे दालन निर्माण केले आहे. यातून मराठीतील आधुनिक भाषाव्यवहार समृध्द होण्यास मोठी मदत झाली असल्याचे प्रतिपादन माहिती संचालक हेमराज बागुल यांनी येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा
करण्यात आला. त्यानिमित्त भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या विविध पुस्तकांचे
तसेच परिभाषा कोश पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे
उद्घाटन श्री. बागुल यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास
जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, माध्यम समन्वयक अनिल गडेकर, सहायक भाषा संचालक
हरिष सुर्यवंशी, अधीक्षक संदीप गोरे आदी उपस्थित होते.
राजभाषा मराठीचा प्रसार आणि प्रचार सर्वदूर व्हावा आणि मराठी भाषेची प्रगती,
विकास करतानाच तसेच प्रशासनामध्ये मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी मराठी
भाषा विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या
निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विद्यार्थी व अभ्यासकांसाठी
शास्त्रीय व तांत्रिक आणि विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासकांसाठी परिभाषा कोश अत्यंत
उपयुक्त असल्याचे सांगतांना हेमराज बागुल म्हणाले की, मराठीतील भाषाव्यवहार गेल्या
काही वर्षात मोठ्याप्रमाणावर विस्तारला आहे. त्यातून या नव्या शब्दांचे
अर्थव्यवस्थापन करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. मराठी भाषिकांना आपल्या
भाषेतील विविध शब्दांचे अर्थ आणि त्याचा छटा समजण्यासोबतच इतर भाषिकांना मराठी
भाषा सुलभतेने आकलन व्हावी यादृष्टीने शब्दकोशांचे महत्त्व मोठे आहे. अलिकडच्या
काळात तर विविध क्षेत्रात घडलेल्या प्रगतीमुळे अनेक नवे शब्द प्रचलित झाले आहेत.
या शब्दांवरही पुढील काळात परिपूर्णतेने काम झाले पाहिजे. तरच नव्यासंदर्भात मराठी
संपन्न होऊ शकेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता मिळाल्यानंतर साहजिकच राज्यातील शालेय
तसेच विद्यापिठासाठी एकरुप मराठी परिभाषा उपलब्ध करुन देण्याचे काम विभागाने
यशस्वीपणे पूर्ण केले आहे. पदवी परिक्षेपर्यंत शिकविले जाणारे शास्त्रीय व
तांत्रिक विषय मातृभाषेतून शिकविण्याचे उपक्रम नागपूर विद्यापिठाने सुरु केला
असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रारंभी सहायक भाषा संचालक हरिष सुर्यवंशी यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा
निमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच
पाहुण्याचे पुस्तक देवून स्वागत केले. संचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या
विविध पुस्तकांचे व कोषांचे तसेच परिभाषा कोषांच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन
माहिती संचालक श्री. बागुल यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन
कार्यालय अधीक्षक संदीप गोरे यांनी केले.
******