शेंगा पोखरणारी, घाटेअळी आढळल्यास किटकनाशक फवारणी करा
- कृषी विभागाचे आवाहन
·
शेतक-यांनो, तूर, हरभरा
पिकांवरील वेळीच कीड व्यवस्थापन करा
नागपूर, दि. 5 : विभागातील
शेतक-यांनी तूर आणि हरभरा पिकांवर पडलेल्या किडीचे वेळीच व्यवस्थापन करुन, होणारी
हानी टाळावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
यासंदर्भात
कृषी विभागातर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नागपूर
विभागातील तूर व हरभरा पीक उत्पादक शेतकऱ्यांनी तुरीवर शेंगांचे नुकसान करणाऱ्या
अळ्या, पाने गुंडाळणारी अळी तसेच हरभरा पिकांवरील घाटेअळी
आणि मर रोगाचे प्रमाण वाढले असून, शेतकऱ्यांनी तूर व हरभरा पिकांवर पडलेल्या रोगांचे
वेळीच कीटकनाशक फवारणी करुन व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तूर
पिकांवरील कीड नियंत्रणासाठी 50 मीटर अंतरावर पाच कामगंध सापळे उभारावेत. एका
हेक्टरमध्ये किमान 50 ठिकाणांवर पक्षी बसू शकतील असे थांबे बनवावेत. तसेच तण आणि पर्यायी
खाद्य नष्ट करावे. सुरुवातीला
निंबोळी अर्काने फवारणी करावी. तसेच इमामकटीन बेंझोएट, क्लोरानटानिलीप्रॉल, पिसारी किडीसाठी फ्लूबेंडामाइड किंवा इंडोक्साकार्ब
आदी कीटकनाशकांची फवारणी करावी. तुरीच्या शेंगांमध्ये अळी आढळून आली
असून, शेंगांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पाने गुंडाळणाऱ्या अळी दिसून आल्यास
अशावेळी शेतक-यांनी क्विनॉलफॉस, लॅम्ब्डा सायहालोथ्रिन आणि लुफेन्यूरॉनची पिकावर फवारणी करावी.
नागपूर विभागात सोयाबीन पिक घेतल्यानंतर हरभरा
पिकांखालील क्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे हरभरा पीक उत्पादक
शेतकऱ्यांनी पिकांवर घाटेअळींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास सुरुवातीच्या काळात पाच
टक्के निंबोळी अर्काने फवारणी करावी. तसेच हरभ-याच्या शेतात पक्षी थांबू शकतील असे
थांबे उभारावेत, जेणेकरुन पिकावरील घाटेअळी नष्ट करण्यास आणि पक्ष्यांना अन्न
मिळण्यास मदत होईल. शेतक-यांनी हरभरा पिकावर घाटेअळीचे प्रमाण वाढल्यास फ्लूबेंडामाइड,
क्विनॉलफॉस, टायझोफॉस, डेल्टामेथ्रीनची दोन वेळा फवारणी करावी.
हरभरा
पिकाला फ्युजारियम उडम जमिनीत बुरशीमुळे मर लागते. पाने पिवळी होऊन झाडे कोमेजून वाळतात. जमिनीलगतचे खोड काळे पडून
शेवटी झाड मरते. हरभरा पिकाच्या खोडावर बुरशी आढळून येते. शेतकऱ्यांनी हरभरा
पिकावरील मर टाळण्यासाठी पिकांची दीर्घकालीन फेरपालट करावी. रोगप्रतिबंधक जाती
पेराव्यात. तसेच पेरणीपूर्व थायरम, टायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी.
विदर्भात
गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पावसाची नोंद झाली
आहे. अशावेळी तूर आणि हरभरा पिकांवर मोठ्या प्रमाणावर तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या
अळ्या आणि हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यांचे वेळीच व्यवस्थापन
करुन शेतकऱ्यांनी पिकांचे होणारे नुकसान टाळावे,असे आवाहन कृषी विभागातर्फे
करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment