Friday, 5 February 2021
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @नागपूर’ उपक्रमास मोठा प्रतिसाद
प्रलंबित 71 टक्के प्रकरणे निकाली
* संस्कृत विद्यापीठाचे राज्यात चार उपकेंद्र
* प्राध्यापक भरतीबाबत लवकरच निर्णय
* उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
नागपूर, दि. 5 : उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आयोजित उच्च व तंत्र मंत्रालय @ नागपूर या कार्यक्रमास आज शिक्षण क्षेत्रातून मोठा प्रतिसाद लाभला. प्रलंबित 2 हजार 272 तक्रारीपैकी 1 हजार 617 तक्रारींचे निवारण वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. प्राप्त तक्रारी, निवेदनापैकी 71 टक्के प्रकरणे मार्गी लागल्याने उपक्रम साफल्याची भावना मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केली.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह आमदार सर्वश्री दुष्यंत चर्तुवेदी, ॲड.अभिजीत वंजारी, नागो गाणार, समीर मेघे, माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्यासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी प्रामुख्याने उपिस्थत होते. शिक्षण संस्था, विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी यांच्या प्रत्येक तक्रारीला मंत्री श्री. सामंत यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतले.
प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आलेलो असल्याने कोणत्याही प्रकारचे स्वागत वगैरेची औपचारिकता स्वीकारणार नाही, अशी भूमिका स्पष्ट करून यावेळी उपस्थित असलेल्या शैक्षणिक क्षेत्राशी निगडित विविध घटकांना संबोधित करून त्यांनी थेट निवेदकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यास सुरुवात केली. देशपांडे सभागृहात नोंदणी करून व ऑनलाईन पध्दतीने निवेदन स्विकारण्यात आली होती. टोकन पध्दतीने तक्रारकर्त्यांचे म्हणणे मंत्री महोदय ऐकून घेत होते.
अनुकंपा तत्त्वावरील नोकरीबाबतच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये दोन नियुक्ती आदेश आज देण्यात आले. नागपूर विभागातील सर्व शैक्षणिक क्षेत्रातील घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@ नागपूर हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. रामटेक विद्यापीठाला सातवा वेतन लागू करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. गोंडवाना विद्यापीठाला पाच कोटी रुपयांचे डाटा सेंटर, मॉडेल कॉलेज सुरू करणे व गोंडवाना विद्यापीठाला विशेष दर्जा देण्याबाबतचे निर्णय झाल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर विद्यापीठाला शतक पूर्तीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी निधीची मागणी केली. विद्यापीठात पदभरती करावी. पाली भाषा संवर्धनासाठी विद्यापीठाने प्रयत्न सुरु ठेवावेत. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांमध्ये नागपूर विद्यापीठाचा समावेश व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला सातत्याने सुरु ठेवण्याचे आग्रही निवेदन त्यांनी केले. संस्कृत भाषेचे संर्वधन व प्रचारासाठी राज्यात कवि कुलगुरु कालिदास विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
गोंडवाना विद्यापीठ व संस्कृत विद्यापीठांना विशेष बाब म्हणून पद भरतीसाठी मान्यता देण्यात आल्याचे सांगून निवेदन प्राप्त होताच त्यावर संबंधीत विभागाला त्यांनी निर्देश दिले.
260 प्राचार्याची भरतीप्रक्रिया सुरू असून प्राध्यापक भरतीबाबत वित्त विभागाशी बैठक घेवून पुढील 15 दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगीतले. परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांच्या फी माफीबाबतही शुल्क निर्धारण समितीशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. परीक्षा घेणे हा सर्वस्वी विद्यापीठाचा निर्णय आहे. कोविडमुळे ऑनलाईन परीक्षा हा एक पर्याय आहे. मात्र कोविड नियंत्रणात आल्यानंतर विद्यार्थी व प्राध्यापक हा संवाद सुरू राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कोविडच्या काळात अनेक वसतिगृह व महाविद्यालय हे कोविड केंद्र व क्वारंटाईन सेंटर होते. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार वसतिगृह सुरू करण्यात येतील, असे ही त्यांनी नमूद केले.
वसंतराव देशपांडे येथील कार्यक्रमाला उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, विभागीय सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंखे, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ.मनोजकुमार डायगव्हाणे, सीईटी आयुक्त डॉ.चिंतामण जोशी, ग्रंथालय संचालनालयाच्या डॉ. शालिनी इंगोले, उपसचिव सतीश तिडके, अजित बाविस्कर यासह संस्थाचालक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@ नागपूर फलश्रुती
आज 809 प्राप्त अर्जापैकी 610 अर्जावर सकारात्मक निर्णय, अनुकंपाच्या 13 प्रकरणांमध्ये नियुक्ती आदेश दिले आहेत. आजच्या कार्यक्रमात दोन आदेश वाटप केले. शिष्यवृत्ती योजनेतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून एकूण 753 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
आज भविष्य निर्वाह निधी परतावा अग्रीम प्राप्त 33 प्रकरणांपैकी 32 निकाली, भविष्य निर्वाह निधी नापरतावा अग्रीम 291 प्राप्त प्रकरणांपैकी 273 निकाली काढले असून शिक्षकेत्तर वेतन निश्चितीचे 131 प्राप्त प्रकरणांपैकी 112 निकाली, एचटीई सेवार्थ 228 प्राप्त प्रकरणांपैकी 204 निकाली, शिक्षकवेतन निश्चिती 570 प्रकरणांपैकी 485 निकाली, भविष्य निर्वाह निधी अंतिम परतावा 287 प्राप्त प्रकरणांपैकी 217 निकाली, सेवानिवृत्ती वेतन 328 प्रकरणांपैकी 220 निकाली. अनुकंपा 37 प्राप्त प्रकरणांपैकी 13 निकाली. डीसीपीएस 23 पैकी 2 निकाली. वैद्यकीय प्रतिपूर्ती 344 प्रकरणांपैकी 59 निकाली. एकूण नागपूर विभागाअंतर्गत 2272प्रकरणांपैकी 1617 निकाली काढण्यात आली. तर 342 प्रकरणे प्रलंबित असून 309 प्रकरणात त्रृटी आहेत. निकाली प्रकरणांची एकूण टक्केवारी 71.17 टक्के आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment