Saturday, 6 February 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर नागपूर विभागातील जिल्ह्यांच्या डीपीडीसीचा सोमवारी आढावा

नागपूर, दि. 6 : उपमुख्यमंत्री तथा नियोजन मंत्री अजित पवार हे रविवार 7 व सोमवार 8 फेब्रुवारी रोजी नागपूर दौऱ्यावर आहेत. 7 फेब्रुवारीला ते नागपूर येथील विविध कार्यक्रमात सहभागी होतील तर सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची जिल्हा विकास आराखड्यांच्या राज्यस्तरीय बैठकी घेणार आहेत. रविवारी 3 वाजता अजित पवार यांचे नागपूर येथे आगमन होणार आहे. देवगिरी येथे त्यांची वेळ राखीव असून दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित 'मीट द प्रेस', कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. सायंकाळी 5 वाजता मुदलीयार चौक शांती नगर येथे पक्षप्रवेश कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. रात्री उशिरा एका लग्न सोहळ्यात ते सहभागी होणार आहे. सोमवारी जिल्हास्तरावर पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांना (डीपीडीसी) मंजुरी देण्याबाबतची राज्यस्तरीय बैठक दुपारी 3.30 ते 6.30 वाजेदरम्यान होणार आहे. या बैठकीत विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा अशा अनुक्रमाने जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येईल. सोमवारी 6.30 वाजता ते जिल्हा वार्षिक योजनासंदर्भात पत्रकार परिषद घेतील. निधीवाटप सूत्रानुसार राज्य शासनामार्फत 2021-22 या आर्थिक वर्षात नागपूर जिल्ह्यासाठी 241.86, वर्धा 110.76, भंडारा 94.18, चंद्रपूर 180.95, गडचिरोली 149.64, गोंदिया 108.39 कोटी अनुज्ञेय नियतव्यय आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्याने आपला नियतव्यय जिल्हास्तरीय बैठकीत निश्चित केला आहे. नागपूर जिल्ह्याने सन 2021-22 वर्षासाठी एकूण 884.90 कोटीची मागणी केली आहे. राज्यस्तरीय मर्यादा 241.86 कोटी आहे. या बैठकीला गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख, वर्धाचे पालकमंत्री सुनील केदार, भंडारा पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह विदर्भातील जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत, असे उपायुक्त, नियोजन शाखा धनंजय सुटे यांनी कळवले आहे. ******

No comments:

Post a Comment