Wednesday, 17 March 2021
कोविड रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा
- डॉ. संजीव कुमार
कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा आढावा
शासकीय व खासगी रुग्णालयांतील कोविड रुग्णांसाठी सुविधा
नागपूर दि. 17: कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, यापैकी ज्या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा तसेच ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अशा रुग्णांसाठी शासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन, बेड, मनुष्यबळ आदि सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त बोलत होते. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, मेयो, मेडिकल, दत्ता मेघे, एम्स, लता मंगेशकर आदि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे सर्व सदस्य तसेच महसूल, उद्योग, पोलिस, अन्न व औषध प्रशासन आदि विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यासह विभागात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स, विविध खासगी वैद्यकीय महाविद्यालये तसेच खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देताना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बेडची संख्या वाढवतानाच ऑक्सिजनसह बेड निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन व खनिज विकास निधीमधून 127 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीमधून कोविड रुग्णांसाठी तात्काळ आवश्यक सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले.
कोविड रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनसह आवश्यक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत आहे. विभागात तसेच जिल्ह्यात तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे कोविड रुग्णही त्याच प्रमाणात वाढत असून, यापैकी ज्या रुग्णांना तात्काळ ऑक्सिजनसह उपचाराची आवश्यकता आहे, अशा रुग्णांसाठी प्राधान्याने बेड उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे.
खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडसंदर्भात माहिती जनतेला उपलब्ध होईल. तसेच ज्या रुग्णांना तात्काळ भरती करण्याची आवश्यकता नाही, अशा रुग्णांसाठी महानगरपालिकेतर्फे गृहविलगीकरणाबद्दल मार्गदर्शन करुन त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. रुग्णांनी अनावश्यक रुग्णालयांमध्ये भरती न होता प्रशासनाच्या सूचनांनुसार आवश्यक औषधोपचारासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे अतिरिक्त ऑक्सिजनयुक्त बेडची उपलब्धता करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तसेच ऑक्सिजन प्लँट आदिबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विविध विभागाचे अधिकारी व टास्क फोर्सचे अधिकारी यांनी भेट देऊन हे काम तात्काळ पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
कोविड रुग्णांसाठी आमदार निवास, पाचपावली तसेच वनामती येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत असून, यापैकी वनामती येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोविड सेंटरमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येऊन आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध राहील, यादृष्टीने नियोजन करावे. तसेच रेमिडेसिवीर हे इंजेक्शन वैद्यकीय सल्ल्यानुसारच उपलब्ध होईल, असेही बैठकीत सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कोविड केअर सेंटर तसेच मेयो व मेडिकल येथे अतिरिक्त आरोग्यसुविधा निर्माण करुन बेडसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण करुन रुग्णांसाठी अतिरिक्त बेड तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबतही वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना सूचना दिल्यात.
कोविडसंदर्भात नागपूर महानगरपालिकेतर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, कोविड रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन तसेच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना औषधपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी सुविधा वाढविण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment